अ‍ॅपशहर

मुंबईकरांना अलर्ट! जूनमधील सर्वात मोठी भरती, नागरिकांच्या सुरक्षेसाठी लाईफ गार्ड तैनात

भारतीय हवामान खात्याकडून मुंबईला अलर्ट देण्यात आला आहे. कारण, आज आणि उद्या मुंबईत सगळ्यात मोठी भरती असणार आहे. यामुळे जर उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झाला तर शहरांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jun 2022, 12:22 pm
मुंबई : मुंबईत आज हलक्या पावसाने हजेरी लावली. अशात १६ आणि १७ जून रोजी अरबी समुद्रात मोठी भरती असणार आहे. यावेळी तब्बल ४.८० ते ४.८७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भरतीदरम्यान ५० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास मुंबईत पाणी साचण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन पालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. अग्निशमन दल व पर्जन्य जलवाहिन्या विभागालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai high tide today


जून महिन्यातील सर्वात मोठी भरती १६ जूनला असून दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी ती सुरू होणार आहे. साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा असल्यास पालिका तसेच राज्य सरकारतर्फे विशेष काळजी घेतली जाते. याकाळात समुद्रावर फेरफटका मारण्यास जाऊ नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. समुद्राला मोठी भरती असल्यामुळे समुद्रालगत असलेल्या पातमुखांचे (आऊटफॉल) दरवाजे बंद केले जाणार आहेत. त्यामुळे समुद्राचे पाणी शहरात शिरण्यापासून अटकाव होणार आहे.

Monsoon Update : राज्यात दमदार पावसाला सुरुवात, मुंबईसह 'या' भागांत वरुणराजा बरसला
पावसाचे साठणारे पाणी हाजी अली, क्लिव्हलँड, इर्ला, ब्रिटानिया, गझदरबंद येथे बसवलेल्या पंपिंग स्टेशनद्वारे समुद्रात फेकण्यात येणार आहे. भरतीच्या वेळेस शहर व उपनगरात ५० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला तर पाणी तुंबण्याची शक्यता असल्याचे पर्जन्य जलवाहिन्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. समुद्राला असलेली भरती लक्षात घेऊन, पालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला सज्ज करण्याच्या सूचना केल्या आहेत. हिंदमाता, गांधी मार्केट नॅशनल कॉलेज, मिलन सबवे, अंधेरी सबवे आदी ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाला सुरक्षा बोटी, लाईफगार्ड सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

समुद्राला ओहोटी लागल्यानंतर शहरात तुंबलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी विभाग कार्यालयातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. पाणी निचरा करण्यासाठी देण्यात आलेले पंप व्यवस्थित सुरू राहतील याची काळजी घ्यावी. ज्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचेल त्या भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

लेकीवर अक्षता पडत असतानाच वडिलांवर काळाचा घाला, मंडपाच्या बाहेरच घडलं भीषण
जून महिन्यातील भरती

तारीख भरतीची वेळ लाटांची उंची
१६ जून दुपारी १.३५ ४.८७
१७ जून दुपारी २.२५ ४.८०
१८ जून दुपारी ३.१६ ४.६६

९३ लाईफ गार्ड तैनात

पालिकेने गिरगाव, दादर, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा या प्रमुख चौपाट्यांवर येणार्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी तब्बल ९३ लाइफ गार्डस तैनात केले आहेत. लाइफ गार्डकडे बचावकार्यासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची साधने उपलब्ध आहेत. तसेच लाईफ गार्डच्या मदतीला रेस्क्यू टीम’चे जवान सज्ज आहेत. जेटकीज, सहा रेस्क्यू बोट, सहा कयाक्स, सहा सर्फ बोर्डसह बचावकार्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री देण्यात आली आहे. समुद्र खवळलेला असताना नागरिकांनी चौपाट्यांवर जाऊ नये, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी केले आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज