अ‍ॅपशहर

मान्सूनआधी छत्री उघडली, मुंबई आणि उपनगरांमध्ये बरसात; आज, उद्या पाऊसवार

मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. फक्त मुंबईतच नव्हे तर राज्यातील इतर भागांमध्येही पाऊस पडला. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 10 Jun 2022, 8:27 am
टीम मटा : मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त पुढे गेल्याने त्याची कसर भरून काढण्याचे काम गुरुवारी मान्सूनपूर्व सरींनी केले. मुंबईच्या आकाशात संध्याकाळपासूनच काळ्या ढगांची गर्दी झाली होती. रात्री उशिरा सीएसएमटी येथे रिमझिम तर दादर, वांद्रे, दहिसर, अंधेरी, पार्ले, प्रभादेवी, कांदिवली, विक्रोळी, भांडुप या परिसरांमध्ये दमदार पाऊस झाला. ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथमध्येही पावसाने हजेरी लावल्याने मान्सूनआधीच छत्री उघडली आहे. राज्यातही अनेक ठिकाणी गुरुवारी पावसाने हजेरी लावली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai weather forecast rain update in maharashtra
मान्सूनआधी छत्री उघडली, मुंबई आणि उपनगरांमध्ये बरसात; आज, उद्या पाऊसवार


मुंबईमध्ये संध्याकाळच्या सुमारास पावसाची वर्दी आली आणि रात्री उशिरा प्रत्यक्ष बरसात झाली. घामाच्या धारा आणि उन्हाच्या तडाख्याला कंटाळलेल्या मुंबईकरांना या पावसाने दिलासा दिला. वातावरणात काहीसा गारवाही निर्माण झाला. उपनगरांमध्ये बहुतांश ठिकाणी या पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी घराकडे परतणाऱ्या नागरिकांची अचानक झालेल्या बरसातीमुळे तारांबळ उडाली.

मुंबईसह ठाणे आणि डोंबिवलीतही पावसाने हजेरी लावली. ठाण्यामध्ये संध्याकाळच्या वेळी पावसाचा जोर अधिक होता. पहिल्याच पावसामध्ये वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. सायंकाळीपासून दिवा, मुंब्रा आणि कळव्यातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. तर घोडबंदरसह ठाण्यातील अनेक भागांमध्ये सायंकाळी वीज नव्हती. दिवा रेल्वे स्थानकातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांची कोंडी झाली होती.

पालघर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गुरुवारी वादळी वारा, विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह रात्री पावणेनऊच्या सुमारास पाऊस सुरू झाला. सुमारे दीड तास झालेल्या वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता. रात्री सव्वादहाच्या सुमारास काही प्रमाणात वीज वितरण पूर्ववत झाले.

आज, उद्या पाऊसवार

मुंबईमध्ये शुक्रवार, शनिवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाण्यामध्ये सोमवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मुंबईला शुक्रवार, शनिवारी तर ठाण्याला सोमवारपर्यंत यलो अॅलर्ट आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर तसेच विदर्भाच्या जिल्ह्यांमध्येही सोमवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर येथे शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वाचे लेख