अ‍ॅपशहर

मुंबईकरांना बाधले दूषित पाणी

उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नका, दूषित पाणी पिऊ नका, अशा सूचना वारंवार देऊनही अनेक मुंबईकरांकडून हे खाणे-पाणी सुटत नाहीत. दूषित पाण्यामुळे, उघड्यावर ठेवलेल्या शीतपेयांमधील बर्फामुळे एप्रिल महिन्यापर्यंत २६०७ जणांना गॅस्ट्रो, पोटात दुखणे, कावीळ यांसारख्या आजारांची बाधा झाली आहे.

Maharashtra Times 27 Jun 2018, 6:53 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम polluted-water


उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नका, दूषित पाणी पिऊ नका, अशा सूचना वारंवार देऊनही अनेक मुंबईकरांकडून हे खाणे-पाणी सुटत नाहीत. दूषित पाण्यामुळे, उघड्यावर ठेवलेल्या शीतपेयांमधील बर्फामुळे एप्रिल महिन्यापर्यंत २६०७ जणांना गॅस्ट्रो, पोटात दुखणे, कावीळ यांसारख्या आजारांची बाधा झाली आहे.

दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासांत पोटदुखी, उलट्या होणे, चक्कर येणे, पोटात मुरडा येणे, जुलाब लागणे अशी लक्षणे दिसू लागतात. पाण्यामुळे संसर्ग झाला आहे, हे रुग्णांना अनेकदा लक्षात येत नाही. त्यामुळे आजाराची तीव्रता वाढते. कावीळ झाल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्याचा अनेक रुग्णांचा कल नसतो. ते घरगुती उपाय करतात. काही गैरसमजुतीमुळे कावीळ बळावते. दूषित पाण्यामुळे जुलाब होतात, तसेच गॅस्ट्रोचा आजार झाल्यास शरीरातील पाणी वेगाने कमी होते. त्यामुळे तोल जाणे, चक्कर येणे यासारखा त्रासही उद्भवतो. दूषित पाण्यामुळे होणारे विकार टाळायचे असतील, तर विशेषतः पावसाळ्यात पाणी पिताना काळजी घ्यायला हवी, याकडे पोटविकारतज्ज्ञ डॉ. शरद नरे लक्ष वेधतात. सध्या मुंबईकरांमध्ये पोटदुखीच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. पोटदुखीसह जुलाब होण्याचा त्रास सुरू झाल्यावर खाण्यात बदल झाला असेल, असे रुग्णांना वाटते. पण दूषित पाण्यामुळेही गॅस्ट्रो होण्याची शक्यता असते. डाएटिंगच्या नावाखाली फक्त फळांचा ज्युस घेतला जातो. मात्र रस्त्यावरील फळांच्या रसामध्ये बर्फ तसेच खाण्याचे रंग वापरलेले असतात. त्यामुळेही कावीळ होण्याची शक्यता असते. दूषित पाणी प्यायल्यानंतर उलट्या होणे, लघवी पिवळी होण्यासारखी लक्षणे दिसत असल्याचे डॉ. विकास चौधरी यांनी सांगितले.

गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या

२०१४- ११०४६

२०१५ - ११०३१

२०१६ -१०१७३

२०१७ - ८५९७

२०१८ (एप्रिलपर्यंत ) - २६०७

कावीळ

२०१४ -१४१८

२०१५ -११८४

२०१६ -१५०७

२०१७ -१२३४

२०१८ (एप्रिलपर्यंत) - ४०२

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज