अ‍ॅपशहर

गोंधळ काही संपेना!

मध्य रेल्वेवरील लोकल गोंधळाची मालिका गुरुवारीही सुरू राहिल्याने सकाळपासून प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. वाहतूक दिवसभर वेगवेगळ्या घटनाक्रमाने विस्कळीत झाली.

Maharashtra Times 17 Aug 2018, 4:00 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम local-train


मध्य रेल्वेवरील लोकल गोंधळाची मालिका गुरुवारीही सुरू राहिल्याने सकाळपासून प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. वाहतूक दिवसभर वेगवेगळ्या घटनाक्रमाने विस्कळीत झाली. त्यात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या तीन एक्स्प्रेसना झालेला उशीर, डोंबिवलीत रूळ ओलांडताना प्रवाशाचा अपघात, दिवा स्थानकातील रेल्वे फाटक जास्त कालावधीसाठी सुरू राहिल्याची भर पडली. या तिन्ही कारणांच्या एकत्रित परिणामांमुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा वाजले. सकाळी ८.३० ते दुपारी ३.३०पर्यंत सुमारे सात तास सुरू असलेला हा गोंधळ प्रवाशांसाठी त्रासदायक ठरला.

सकाळी ८.३० वाजल्यापासूनच गाड्यांचा वेग मंदावला. त्यामुळे जलद आणि धीम्या गतीच्या दोन्ही वाहतुकीवर परिणाम झाला. या सात तासांत तीन वेगवेगळ्या घटनांनी लोकल सेवेवर परिणाम होत गेला. स. ८.३०च्या सुमारास डोंबिवली स्थानकाजवळ रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशास सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलची धडक लागली. अपघातग्रस्त व्यक्तीस तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे साधारण १५ मिनिटांपर्यंत लोकल थांबवली गेली. त्यापाठोपाठ दोन लोकल मागोमाग उभ्या राहिल्या. त्यातून सेवा पूर्ववत होईल, असे वाटत असतानाच दिवा स्थानकाजवळील रेल्वे फाटक सकाळी नऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे उघडण्यात आले. गाड्यांच्या वाहतुकीसाठी उघडण्यात आलेले फाटक अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ खुले राहिले. त्यातूनही वेळापत्रक बिघाडात भर पडली.

या दोनही घटनांपाठोपाठ सीएसएमटी, एलटीटीच्या दिशेने येणाऱ्या तीन एक्स्प्रेस उशिराने धावत असल्याने हा खोळंब्यात आणखी भर पडली. या गाड्यांना मार्ग उपलब्ध करण्यासाठी जलद लोकल वाहतूकही काही वेळासाठी थांबवली गेली. या लोकलना कल्याण, डोंबिवलीपुढे धीम्या मार्गावर वळवले गेले. त्याचाही परिणाम लोकल सेवांच्या वेळापत्रकावर झाला. दुपारी ३.३०नंतर वाहतूक हळूहळू मार्गी येऊ लागला. पण दिवसभराच्या गोंधळाची झळ रात्री उशिरापर्यंत जाणवत गेली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज