अ‍ॅपशहर

उपग्रहनिर्मिती प्रक्रियेच्या माहितीचे लोकार्पण

प्रयोग यशस्वी झाल्यावर त्याच्या यशाची माहिती सर्वत्र प्रसिद्ध केली जाते. मात्र या प्रयोगातील वैज्ञानिक तपशील पूर्णपणे खुला केला जात नाही. विज्ञान क्षेत्रातील या रुढीला छेद देत इतर विद्यार्थ्यांनीही उपग्रह तयार करावेत, या उद्देशाने आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी उपग्रह निर्मितीच्या प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीचे लोकार्पण केले आहे.

Maharashtra Times 28 Feb 2018, 9:46 am
आयआयटीच्या उपग्रह टीमची विज्ञान दिनी भेट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sattelitte


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

एका प्रयोगशाळेत संशोधन होते... त्याच्या चाचण्या होतात... प्रयोग यशस्वी झाल्यावर त्याच्या यशाची माहिती सर्वत्र प्रसिद्ध केली जाते. मात्र या प्रयोगातील वैज्ञानिक तपशील पूर्णपणे खुला केला जात नाही. विज्ञान क्षेत्रातील या रुढीला छेद देत इतर विद्यार्थ्यांनीही उपग्रह तयार करावेत, या उद्देशाने आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी उपग्रह निर्मितीच्या प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीचे लोकार्पण केले आहे. विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयआयटीमधील उपग्रह टीमने आपल्या वतीने सर्वच भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही छोटी भेट देण्याचे ठरविले आहे. यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यातील विद्यार्थ्यांना उपग्रहनिर्मिती शक्य होणार आहे.

आयआयटी मुंबईतील उपग्रह टीमने 'प्रथम' या उपग्रहाचे आयआयटी आणि भारतीय अंतराळा संस्थेच्या (इस्रो) सहकार्याने अवकाशात उड्डाण केले. या उपग्रहाच्या यशानंतर, आता नव्या टीमने उपग्रह कार्यक्रम पुढे नेत 'अॅडिव्हिटी' या उपग्रहाची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. या उपग्रहाची निर्मिती करत असताना त्याचा सर्व तपशील सर्वांसाठी खुला करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

अन्य विद्यार्थ्यांनी पुढे यावे

आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी उपग्रह विकसित करून नवीन तंत्रविष्कार अनुभवावा, या उद्देशाने 'प्रथम'ची निर्मिती झाली होती. आता तो उद्देश साध्य झाला आहे. यामुळे आता या अंतराळ क्षेत्रात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संशोधन करण्यासाठी पुढे यावे, या उद्देशाने आम्ही ही माहिती https://www.aero.iitb.ac.in/satelliteWiki/index.php/Satellite_101 या वेबसाइटवर खुली करून दिल्याचे 'प्रथम' टीमचा सदस्य आणि अॅडिव्हिटीचा प्रकल्प संचालक यश संघवी याने सांगिलते. ही माहिती देण्यासाठी 'सॅटेलाइट १०१ विकि'चा जन्म झाला. या वेबसाइटवर निर्मिती प्रक्रियेबरोबरच उपग्रह अंतराळ सोडेपर्यंतचा सर्व तपशील देण्यात आला आहे. प्रत्येक सभासदाला एक-एक प्रकरण लिखाणासाठी देण्यात आले, ते तज्ज्ञांकडून तपासून ते वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आल्याचे या टीमची सदस्य सुकन्या कुडव हिने सांगितले. या माहितीचा उपयोग करून देशभरातील महाविद्यालये विद्यार्थी उपग्रह तयार करण्यासाठी पुढाकार घेतली, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच या व्यासपीठावर उपग्रह निर्मितीबाबत खुली चर्चा होईल, असेही आम्हाला वाटत असल्याचे टीमच्या सदस्यांनी सांगितले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज