अ‍ॅपशहर

तुकाराम मुंढे यांची अखेर बदली

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेले नवी मुंबई महापालिकेचे 'डॅशिंग' आयुक्त तुकाराम मुंढे यांना अखेर सर्वपक्षीय दबावामुळे जावं लागलं आहे. मुंढे यांची आज राज्य सरकारकडून बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी पुणे येथे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक या पदावर असलेले एन. रामस्वामी यांची वर्णी लावण्यात आली आहे.

Maharashtra Times 24 Mar 2017, 9:57 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम navi mumbai municipal commissioner tukaram mundhe transferred
तुकाराम मुंढे यांची अखेर बदली


गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेले नवी मुंबई महापालिकेचे 'डॅशिंग' आयुक्त तुकाराम मुंढे यांना अखेर सर्वपक्षीय दबावामुळे जावं लागलं आहे. मुंढे यांची आज राज्य सरकारकडून बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी पुणे येथे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक या पदावर असलेले एन. रामस्वामी यांची वर्णी लावण्यात आली आहे. मुंढे यांच्या बदलीचे येत्या काळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंढे यांची बदली नेमकी कुठे करण्यात आली, याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई पालिका आयुक्तपदाची सूत्रं हाती घेताच अनधिकृत बांधकामं, अतिक्रमणं, भ्रष्टाचार यांना वेसण घालण्यासाठी कठोर पावलं उचलली होती. तिथेच वादाची ठिणगी पडली आणि मुंढे यांच्याविरोधात सर्वपक्षीय एकजूट पाहायला मिळाली. तुकाराम मुंढे लोकप्रतिनिधींचा आदर राखत नाहीत, असं कारण पुढे करत 'मुंढे हटाव' मोहीम हाती घेण्यात आली. दुसरीकडे करदाते नागरिक मात्र उघडपणे मुंढे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. मुंढे यांना हटवण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह सगळ्याच पक्षांचे नगरसेवक सरसावले असताना नवी मुंबईकरांनीही आपला लढा तीव्र केला.

या सगळ्या घटनाक्रमात गेल्या ऑक्टोबर महिन्यात मुंढे यांच्याविरोधात पालिकेमध्ये अविश्वास ठराव मांडण्यात आला आणि तो मंजूरही करण्यात आला. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंढे यांच्यामागे ठामपणे उभे राहिले. पालिकेच्या अविश्वास ठरावाची अंमलबजावणी करणार नाही, असे ठणकावत मुख्यमंत्र्यांनी मुंढे यांना काम सुरू ठेवण्यासाठी 'हिरवा कंदील' दाखवला. या सगळ्या घडामोडींना पाच महिनेही उलटत नाहीत तोच आज अचानक नवी मुंबईत रामस्वामी यांच्या रूपाने नवा आयुक्त देण्यात आल्याची बातमी थडकल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

नवी मुंबई पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादीसह शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेतृत्वानेही मुंढे यांना सातत्याने विरोध केलेला आहे. भाजपच्या स्थानिक नेत्या मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुंढे यांच्या बदलीची मागणी केली होती. या सततच्या दबावामुळेच मुंढे यांची नवी मुंबईतून पाठवणी करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज