अ‍ॅपशहर

राज्य कोरोनाशी झुंजत होतो तेव्हा सावंत बंडाचं प्लॅनिंग करत होते, व्वा रे आरोग्यमंत्री... राष्ट्रवादी खवळली

महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना ते सरकार पाडण्यासाठी मी आमदारांचं काऊन्सिंग केलं, असा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला. त्यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच खवळला आहे.

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Mar 2023, 9:23 pm
मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी १५० बैठका घेतल्या आणि आमदारांचं मन वळवलं, अशी पोटातही बात ओठावर आणली ती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी... धाराशिव जिल्हातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी 'अंदर की बात' जगजाहीर सांगितली. ज्यानंतर विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीने तर तानाजी सावंत यांच्यावर सडकून टीका केली आहे.

व्वा रे आरोग्यमंत्री... राष्ट्रवादी खवळली

वाह रे आरोग्यमंत्री... जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी झुंजत होता आणि मविआ सरकार कोरोनावर मात करण्यासाठी लढत होते, सर्वसामान्यांना उपचार मिळावेत, लसीकरण व्हावे, रोगाचे निर्मूलन व्हावे म्हणून काम करत होते, तेव्हा तुम्ही तत्कालिन सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने बंड करण्याची, सरकार पाडण्याची आणि राज्यात अस्थिरता आणण्याची खलबतं करत होतात. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत बैठका घेत होतात.

आक्रस्ताळेपणा अंगलट, गुणरत्न सदावर्तेंना दणका, पुढील २ वर्षे वकिली करता येणार नाही!
ज्यांना राज्य एका महाभयंकर रोगाचा सामना करत असतानाही सत्तालोलुपता जास्त प्रिय वाटते, त्यांच्याकडे आज राज्याच्या आरोग्याची जबाबदारी ईडी सरकारने टाकली आहे यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचे दुर्दैव ते अजून काय असावे? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीने केला आहे.

जितेंद्र आव्हाड सावंतांवर तुटून पडले

आज सत्य समोर आलं. सत्ताबदलामध्ये तानाजी सावंत यांचे काम हे काऊन्सिलिंग आणि मिटिंगचे होते. त्यांनी एकनाथ शिंदेंबरोबर आमदारांचे काऊन्सिलिंग केल्यानंतर १००-१५० बैठका घेतल्या. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर १००-१५० बैठका घेतल्या. आमदारांचं मतपरिवर्तन केलं आणि मग सत्ता परिवर्तन झालं. म्हणजे सत्ता परिवर्तनाच्या मागे प्रमुख भूमिका तानाजी सावंत यांची होती. हे आज महाराष्ट्राला कळलं. अर्थात गद्दारी करायची हे आधीच ठरले होते आताची देत असलेली कारण खोटी आहेत हेच सिध्द होते, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सावंत यांच्यावर निशाणा साधलाय.

सावरकरांना माफीवीर म्हणू नका, पवारांनी राहुल गांधींना खडसावलं, हायव्होल्टेज बैठकीत काय झालं? वाचा...
तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले होते...?

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो. लोकांनी आमच्या बाजूने कौल दिला. मात्र उद्धव ठाकरे भाजपशी बेईमानी करुन मविआ सरकार स्थापन केलं. ते सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी आमदारांचे कॉन्सलिंग करण्यासाठी दीडशे बैठका घेतल्या, असं डॉ. सावंत म्हणाले.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख