अ‍ॅपशहर

समीर वानखेडेंनी स्वत:चं जात प्रमाणपत्र प्रसिद्ध करावं, नाहीतर... नवाब मलिक यांचं आव्हान

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा मी काल शेअर केलेला जन्मदाखला खरा आहे. तो खोटा असेल असं वानखेडे कुटुंबीय म्हणत असतील तर त्यांनी समीर यांचं जात प्रमाणपत्र प्रसिद्ध करावं, असं आव्हान नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिलं आहे.

Authored byगणेश कदम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Oct 2021, 6:27 pm

हायलाइट्स:

  • समीर वानखेडेंच्या जन्म दाखल्याचा वाद पेटला
  • नवाब मलिक म्हणाले, मी दिलेला दाखलाच खरा
  • समीर वानखेडेंनी जात प्रमाणपत्र जाहीर करावं - मलिक
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Nawab Malik
नवाब मलिक
मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यातील वाद आणखीच पेटला आहे. नवाब मलिक यांनी काल समीर वानखेडे यांचा जन्मदाखला सोशल मीडियात शेअर केला होता. त्यांचं नाव समीर दाऊद वानखेडे असल्याचं म्हटंल होतं. तसंच, वानखेडे यांनी गैरप्रकार करून नोकरी मिळवल्याचा दावाही त्यांनी केला होता. वानखेडे यांनी लगेचच ते आरोप फेटाळले होते. मात्र, आज मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन वानखेडे यांना जात प्रमाणपत्र प्रसिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे.
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. 'काल मी जो जन्म दाखला शेअर केला होता. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मी हिंदू मुस्लिम म्हणून हे मुद्दे मांडत नाहीए. भाजप ह्याला धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करत आहे. समीर खान, आर्यन खान मुस्लिम आहे म्हणून नवाब मलिक हे सगळं करताहेत, असा आरोप भाजप करतोय, पण धर्माच्या नावानं कधीही राजकारण केलेलं नाही,' असं मलिक म्हणाले.

वाचा: समीर वानखेडेंसाठी 'हा' माणूस करतो वसुली; एका पत्राच्या आधारे नवाब मलिक यांनी सांगितलं नाव

'समीर वानखेडे यांचा मी दिलेला जन्माचा दाखला खरा आहे. त्यावर वानखेडेंच्या वडिलांचं नाव दाऊद आहे. बारकाईनं पाहिल्यास त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मुंबईसारख्या ठिकाणी जन्माचे दाखले ऑनलाइन सहज मिळतात. वानखेडेंच्या बहिणीचं सर्टिफिकेट ऑनलाइन उपलब्ध आहे. पण वानखेडे यांचं सर्टिफिकेट ऑनलाइन मिळत नाही. आम्ही रजिस्टर चेक केलं. दीड महिने आम्ही हा कागद शोधत होतो. तेव्हा हे स्कॅन डॉक्युमेंट मिळालं. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. ज्ञानेश्वर वानखेडे जन्मानं दलित आहेत. वाशिममधून त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवलं. त्याच आधारे नोकरी केली. माझगावमध्ये असताना त्यांनी स्वर्गीय झायदा खान यांच्यासोबत लग्न केलं. ते दाऊद खान बनले. दोन मुलांचा जन्म झाला. पूर्ण कुटुंब मुस्लिमाप्रमाणे जगत होतं हे वास्तव आहे. वडिलांच्या आधीच्या कागदपत्राच्या आधारावर समीर वानखेडे यांनी आपली कागदपत्रे तयार केली. बोगस कागदपत्राच्या साह्यानं त्यांनी एका मागासवर्गीय मुलाचा अधिकार हिसकावून घेतला. याबाबत विविध दलीत संघटना माझ्या संपर्कात आहेत. आम्ही हे प्रमाणपत्र जातवैधता समितीसमोर सादर करणार आहोत. वानखेडे यांच्या विरोधात तक्रार करणार आहेत. सत्य लोकांसमोर येईल,' असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.

वाचा: पुण्यात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांवर बिबट्याचा हल्ला; गालावर, पायावर मारले पंजे

'मी काल जाहीर केलेला समीर वानखेडे यांचा जन्मदाखला खोटा असल्याचं त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात येतंय. तो दाखला खोटा असेल तर खरा दाखला वानखेडें यांनी प्रसिद्ध करावा. समीर वानखेडे यांनी आपलं जातप्रमाणपत्र प्रसिद्ध करावं. तुम्ही ते स्वत: ते करत नसाल तर आम्ही जन्मदाखल्याप्रमाणे जातीचा दाखलाही शोधून काढू,' असा इशारा मलिक यांनी दिला आहे.

महत्वाचे लेख