अ‍ॅपशहर

जयसिंघानीच्या याचिकेवर आज सुनावणी? अटक बेकायदा असल्याचा याचिकेत दावा

Mumbai News : अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचे आरोपी जयसिंघानी यांच्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र टाइम्स 27 Mar 2023, 6:36 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :‘आमची अटक बेकायदा आहे. पोलिसांनी अटकेची कारवाई करताना कायदेशीर तरतुदींचेही पालन केले नाही. त्यामुळे आमच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले असून अटक बेकायदा ठरवून अंतरिम जामीन मंजूर करावा’, अशी विनंती करत अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणातील आरोपी अनिल जयसिंघानी व त्याचा चुलत भाऊ निर्मल जयसिंघानी यांनी केलेल्या याचिकेवर आज, सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jaysinghani
जयसिंघानीच्या याचिकेवर आज सुनावणी? अटक बेकायदा असल्याचा याचिकेत दावा


‘अनिलला गुन्हेगारी प्रकरणातून बाहेर काढावे यासाठी त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देऊ केली. तसेच लाच न स्वीकारल्याने अनिक्षाने अमृता यांना खोट्या चित्रफिती व संदेशांद्वारे ब्लॅकमेल करून धमकावले’, अशा आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अनिक्षा याप्रकरणी १६ मार्चपासून अटकेत आहे. अनिल व निर्मल जयसिंघानी या दोघांना पोलिसांनी गुजरातमधून २० मार्चला अटक केली. हे दोघेही २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.

‘आमची अटक ही राजकीय हेतूने प्रेरित आहे. या प्रकरणात आम्हाला विनाकारण गोवण्यात आले आहे. शिवाय आमच्यावरील अटक कारवाईही बेकायदा आहे. अटकेनंतर २४ तासांच्या आत न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करणे फौजदारी दंड संहितेच्या तरतुदींनुसार बंधनकारक असूनही पोलिसांनी त्याचा भंग केला. आम्हाला ३६ तासांनंतर सत्र न्यायालयात हजर केले. त्यामुळे आमच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले आहे’, असा दावा या दोघांनी अॅड. मनन संघाय व अॅड. मृगेंद्र सिंह यांच्यामार्फत केलेल्या रिट याचिकेत केला आहे.

महत्वाचे लेख