अ‍ॅपशहर

आईच्या दुधाचीही करतात किंमत

लहान बाळांसह प्रवास करणाऱ्या महिलांना आल्या बाळाला विनासंकोच दूध पाजता यावे, या उद्देशाने मुंबईतील पहिला मोफत स्तनपान कक्ष वांद्रे रेल्वेफलाट क्रमांक एक येथे सुरू करण्यात आला. मात्र अवघ्या चार महिन्यांमध्ये या कक्षामध्ये 'पैसे द्या, सेवा घ्या' अशी अरेरावी सुरू झाली आहे. या कक्षाचा उपयोग हा मोबाइल चार्जिंग करणे, डबे खाणे, खुंटीला कपडे लावून ठेवण्यासाठी केला जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर निदर्शनास आले. आधीच मूत्रविसर्जनासाठी पैसे आकारून महिलांची कुंचबणा केली जात असताना, आता स्तनपानाच्या या नैसर्गिक हक्कासाठी आडोसा ठरणाऱ्या या कक्षाच्या वापरासाठीही आईकडून निर्लज्जपणे पैसे उकळण्यापर्यंत संस्थाचालकांची मजल गेली आहे.

शर्मिला कलगुटकर | Maharashtra Times 19 Feb 2018, 2:00 am
मुंबई : लहान बाळांसह प्रवास करणाऱ्या महिलांना आल्या बाळाला विनासंकोच दूध पाजता यावे, या उद्देशाने मुंबईतील पहिला मोफत स्तनपान कक्ष वांद्रे रेल्वेफलाट क्रमांक एक येथे सुरू करण्यात आला. मात्र अवघ्या चार महिन्यांमध्ये या कक्षामध्ये 'पैसे द्या, सेवा घ्या' अशी अरेरावी सुरू झाली आहे. या कक्षाचा उपयोग हा मोबाइल चार्जिंग करणे, डबे खाणे, खुंटीला कपडे लावून ठेवण्यासाठी केला जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर निदर्शनास आले. आधीच मूत्रविसर्जनासाठी पैसे आकारून महिलांची कुंचबणा केली जात असताना, आता स्तनपानाच्या या नैसर्गिक हक्कासाठी आडोसा ठरणाऱ्या या कक्षाच्या वापरासाठीही आईकडून निर्लज्जपणे पैसे उकळण्यापर्यंत संस्थाचालकांची मजल गेली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no value of mothers milk
आईच्या दुधाचीही करतात किंमत


चार महिन्यांपूर्वी वांद्रे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक येथे हा कक्ष सुरू करण्यात आला. या कक्षामध्ये आई बाळाला घेऊन गेली, तर तिला आडोशासाठी दरवाजा लावून घेता येतो. या कक्षालगत महिला शौचालयेही आहेत. वांद्रे रेल्वेस्टेशनच्या बाहेर या कक्षाची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. मात्र या परिसरात रस्त्यावर फळे-भाज्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी ही मोबाइल चार्जिंगची जागा झाली आहे. ही सुविधा रेल्वेतर्फे पूर्णपणे मोफत देण्यात आली असली, तरीही त्या कक्षाच्या वापरासाठी दोन ते चार रुपयांची मागणी केली जाते. त्याबाबत विचारणा केली असता, 'साफसफाई करावी लागते' असे उत्तर मे. मारू सेवा संघ या संस्थेमार्फत येथील व्यवस्थापन पाहणाऱ्या व्यक्तीने दिले

बाळाला दूध पाजण्यासाठी स्तनपान कक्षाच्या वापरासाठी पैसे आकारणे हा अक्षम्य गुन्हा आहे, असे मत सावित्रीबाई स्त्री संसाधन केंद्राच्या डॉ. कामाक्षी भाटे यांनी व्यक्त केले. हे कक्ष कसे असायला हवेत, यासंदर्भात नियमावली आहे. बाळाला दूध पाजणे ही केवळ शारीरिक क्रिया नसून त्यात आईच्या भावनिक स्थितीचाही विचार व्हायला हवा, असे स्पष्ट मत डॉ. भाटे यांनी व्यक्त केले. तर अॅड. मनीषा तुळपुळे यांनीही कक्षाच्या वापरासाठी दरआकारणी करण्यास विरोध दर्शवला. याउलट रेल्वेने या कक्षाची माहिती अधिकाधिक गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असेही तुळपुळे यांनी सांगितले.

या कक्षाची सुविधा ही पूर्णपणे मोफत आहे. तिचा लाभ बाळांना घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांनी घ्यायला हवा. ही सेवा मोफत असल्यामुळे चार महिन्यांत किती महिलांनी या सुविधेचा लाभ घेतला, याची माहिती आम्ही ठेवलेली नाही.

- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

या कक्षांचा वापर सर्वसामान्य कष्टकरी महिलेपासून ते नोकरदार स्त्रियांपर्यंत प्रत्येक गरजू महिलेला करता यायला हवा. आज मुंबईत प्रवास करताना लहान बाळांच्या मातांना ही अडचण भेडसावते. ही सुविधा मोफतच असायला हवी. त्यासाठी पैसे आकारणे गैर आहे.

- विजया रहाटकर, महिला आयोग अध्यक्षा
लेखकाबद्दल
शर्मिला कलगुटकर
शर्मिला कलगुटकर या महाराष्ट्र टाइम्स च्या मुंबई आवृत्तीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांना पत्रकारितेमध्ये २१ वर्षाचा अनुभव आहे. त्या आरोग्य, सामाजिक, जेंडर अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्यापूर्ण लिखाण आणि वार्तांकन करतात. आरोग्यक्षेत्रातील अनेक गैरप्रकारांना त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. या कार्याची दखल घेत त्यांना पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज