अ‍ॅपशहर

पाडगावकर, गायतोंडेंसह पाच जणांची नावे रस्ते, चौकांना

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांना साहित्य आणि संस्कृतीचे भरते आले आहे.

Maharashtra Times 11 Dec 2016, 2:00 am
nitin.chavan@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम padgaonkar chowk
पाडगावकर, गायतोंडेंसह पाच जणांची नावे रस्ते, चौकांना


Tweet : @nitinchavanMT

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांना साहित्य आणि संस्कृतीचे भरते आले आहे. मराठी साहित्य, संगीत, चित्रकला, नाट्य क्षेत्रात आपल्या नाममुद्रा झळकवणारे कविवर्य मंगेश पाडगावकर, चित्रकार वासुदेव गायतोंडे, नाटककार विद्याधर गोखले यांच्यासह पाच मान्यवरांची नावे मुंबईतील विविध भागांतील रस्ते आणि चौकांना दिली जाणार आहेत.

दादर येथील जी-उत्तर विभागात बाळ गोविंददास मार्ग व सेनापती बापट मार्ग जेथे मिळतात तेथे तयार झालेल्या चौकास नाटककार विद्याधर गोखले यांचे नाव दिले जाणार आहे. अंधेरीतील के-पश्चिम विभागात गुलमोहर क्रॉस रोड नं. १२ या मार्गास हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक व संगीत शिक्षक पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे नाव दिले जाणार आहे.

जी-दक्षिण विभागात जुनी प्रभादेवी मार्ग आणि स्वा. सावरकर मार्गाला जोडणाऱ्या नाक्यावरील चौकास कविवर्य मंगेश पाडगावकर चौक असे नाव देण्यात येणार आहे. डी विभागात गिरगाव येथे आर.आर. रोड व टाटा रोड नंबर २ एकत्र येतात त्या चौकास आंतराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार वासुदेव गायतोंडे यांचे नाव दिले जाणार आहे. डी विभागातील नाना चौक येथील जावजी दादाजी मार्ग व जगन्नाथ पथ येथील चौकास ज्येष्ठ गायिका व नाट्य कलावंत सुमती बाळासाहेब टिकेकर यांचे नाव देण्यात येणार आहे.

आचारसंहितेपूर्वी उद‍्घाटनांचा बार

या पाच मान्यवरांसोबतच इतरांचीही नावे मुंबईतील विविध भागांतील रस्ते व चौकांना देण्याचे तब्बल ७० प्रस्ताव महापालिकेच्या डिसेंबर महिन्याच्या पटलावर आहेत. या सर्व रस्ते व चौकांना नाव देण्यास प्रभाग समित्यांची मंजुरी मिळाली असून अंतिम मंजुरीसाठी हे प्रस्ताव महापालिका सभागृहाच्या कामकाजात आहेत. या महिन्यात या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी त्यांच्या उद‍्घाटनांचा बार उडवला जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज