अ‍ॅपशहर

नामवंत शाळांमध्ये प्रवेशाचे आमिष; लाखोंचा गंडा

प्रसिद्ध शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश घेण्यासाठी पालक कोणकोणते मार्ग अवलंबतात, हे माटुंगा येथील एका फसवणुकीच्या घटनेतून समोर आले आहे. दादर, माटुंगा येथील नामवंत शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जादा पैसे मोजणाऱ्या पालकांना लाखो रुपयांच्या लुबाडणुकीला सामोरे जावे लागले आहे.

Maharashtra Times 30 Sep 2018, 8:37 am
dipesh.more@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम school-parents

@dipeshmoreMT

मुंबई : प्रसिद्ध शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश घेण्यासाठी पालक कोणकोणते मार्ग अवलंबतात, हे माटुंगा येथील एका फसवणुकीच्या घटनेतून समोर आले आहे. दादर, माटुंगा येथील नामवंत शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जादा पैसे मोजणाऱ्या पालकांना लाखो रुपयांच्या लुबाडणुकीला सामोरे जावे लागले आहे. शाळा प्रवेशाचा काळा धंदा सुरू केलेल्या टोळीतील तिघांना माटुंगा पोलिसांनी अटक केली असून, मुख्याध्यापकांशी ओळख असल्याचे भासवत किंवा राजकीय नेत्यांमार्फत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत या टोळीने पालकांना लाखोंना फसवल्याचे उघड झाले आहे.

माटुंगा येथील डॉन बॉस्को आणि वडाळा येथील सेंट जोसेफ या प्रसिद्ध शाळांमध्ये आपल्या पाल्यांना ज्युनिअर केजीमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी काही पालकांनी अर्ज केले होते. प्रवेश यादी पाहण्यासाठी त्यांनी शाळेची कार्यालये गाठली. फीपेक्षा जास्त पैसे देऊनही प्रवेश न मिळाल्याने त्यांनी मुख्याध्यापकांची भेट घेतली. त्यांनी आपल्याकडील पावत्या मुख्याध्यापकांना दाखविल्या. मात्र या पावत्या बोगस असल्याचे समजताच आपली फसवणूक झाल्याचे पालकांना समजले. सेंट जोसेफ शाळेच्या मुख्याध्यापकांनी माटुंगा पोलिस ठाण्यात याप्रकरणी लेखी तक्रार केली. पोलिसांनी अशा पालकांकडून या टोळीची माहिती मिळवली. फोन व इतर तांत्रिक पुराव्यांवरून कुर्ला येथून चंद्रकांत भोसले याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने घाटकोपरच्या राधेश्याम बिंद आणि श्यामलाल राजभर यांच्या मदतीने अनेक पालकांना फसवल्याचे समोर आले.

'ज्युनिअर केजी'साठी लाखभर रुपये

चंद्रकांत भोसले याने गेल्या काही वर्षांपासून हा प्रवेशाचा धंदा थाटला होता. कधी थेट मुख्याध्यापक तर, कधी राजकारणी व्यक्तींच्या माध्यमातून प्रवेश मिळवून देतो, असे तो पालकांना सांगायचा. आतापर्यंतच्या चौकशीत त्याने तीन पालकांना फसविले असून, त्यांच्याकडून प्रत्येकी १ लाख २० हजार रु., १ लाख ५ हजार रु., ७५ हजार रु. घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज