अ‍ॅपशहर

प्लाझ्मादात्यांचा पालिकेकडून सत्कार

करोनावर अद्याप कुठलीही लस सापडलेली नाही. मात्र रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी आशेचा किरण ठरण्याची शक्यता आहे. महापालिकेने केलेल्या आवाहनानंतर आतापर्यंत २००हून अधिक करोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मादानाची तयारी दर्शवली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 28 Jul 2020, 5:17 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्लाझ्मादात्यांचा पालिकेकडून सत्कार
plazma


करोनावर अद्याप कुठलीही लस सापडलेली नाही. मात्र रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी आशेचा किरण ठरण्याची शक्यता आहे. महापालिकेने केलेल्या आवाहनानंतर आतापर्यंत २००हून अधिक करोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मादानाची तयारी दर्शवली आहे. प्लाझ्मादान करणाऱ्या नागरिकांचा पालिकेतर्फे विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

करोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी गेल्यानंतर अन्य बाधित रुग्णांना प्लाझ्मादान करून जीवनदान द्यावे, याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी प्लाझ्मादानाची संकल्पना मांडण्यात आली आहे. प्लाझ्मादान करण्यास येणाऱ्यांची तपासणी करण्यात येते. त्यांना कुठला आजार आहे का, वय ५५ वर्षांपेक्षा अधिक नाही ना याची खातरजमा केल्यानंतर प्लाझ्मादान करणाऱ्या रुग्णाचा चाचणी अहवाल अनुकूल असेल तर त्यास प्लाझ्मादान करण्यास परवानगी दिली जाते, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

प्लाझ्मादानाची प्रक्रिया इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पडते. यानुसार पालिकेने मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात प्लाझ्मा केंद्र सुरू केले आहे. तसेच सायन, केईएम, कस्तुरबा रुग्णालयासह, राज्य सरकारच्या अखत्यारीतील जे. जे. रुग्णालयातही प्लाझा थेरपीची कार्यवाही सुरू असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

५० दाते चाचणीत पात्र

धारावी आणि अणुशक्तीनगर, चेंबूर येथील आरोग्य शिबिरांमध्ये सुमारे ५० प्लाझ्मादाते प्राथमिक चाचणीत पात्र ठरले असून यातील सुमारे दहा जणांचा प्लाझ्मा घेण्यात आला आहे. उर्वरित दात्यांचा प्लाझ्मा येत्या काही दिवसांत घेतला जाणार आहे. या दात्यांपैकी नऊ जणांचा प्रमाणपत्र देऊन पालिकेत प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. खासदार राहुल शेवाळे, जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, नगरसेवक वसंत नकाशे यावेळी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज