अ‍ॅपशहर

‘पोतन्ना यांची सरकारकडून हत्या’

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याप्रश्नी अशोक चव्हाण यांची टीका

Maharashtra Times 12 Nov 2018, 1:40 pm
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ashok-chavan


कर्जबाजारीपणा, नापिकी, दुष्काळ अशा फेऱ्यात अडकलेल्या नांदेडच्या उमरी तालुक्यातील तुराटी या गावातील शेतकरी पोतन्‍ना राजन्ना बोलपिलवाड यांनी आपल्या शेतात चिता रचून स्वतःला पेटवून घेऊन जीवनयात्रा संपवली. ही आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्या आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. पोतन्ना यांच्या कुटुंबीयांना काँग्रेसने ५० हजारांची रोख मदत दिल्याची माहिती प्रदेश काँग्रेसने रविवारी पत्रकाद्वारे दिली.

भाजप-शिवसेना सरकारची खोटी आश्वासने, फसव्या घोषणा शेतकऱ्यांच्या जिवावर उठल्या आहेत. सरकारकडून वारंवार केल्या जाणाऱ्या फसवणुकीमुळे शेतकरी निराश झाले आहेत. राज्यात १६ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पोतन्‍ना यांच्याकडे भारतीय स्टेट बँकेचे अडीच लाख आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सेवा सहकारी सोसायटीचे प्रत्येकी ४० हजार असे एकूण तीन लाख ३० हजारांचे कर्ज होते. त्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरला होता; मात्र त्या यादीत नाव न आल्यामुळे ते निराश होते, असा दावा चव्हाण यांनी केला.

सरकारकडून मदत नाही!

पोतन्ना यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून अद्याप कोणतीही मदत देण्यात आलेली नाही; मात्र प्रदेश काँग्रेसतर्फे चव्हाण यांनी त्यांना ५० हजारांची मदत केली. पक्षाच्या वतीने आ. अमरनाथ राजूरकर यांनी तुराटी गावी जाऊन पोतन्ना यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व मदतीची रक्कम सुपूर्द केली. पोतन्ना यांचा मुलगा माधव यांनी ही मदत स्वीकारल्याचे काँग्रेसच्या पत्रकात म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज