अ‍ॅपशहर

सीए होण्याच्या स्वप्नाचा ताळेबंद

आजाराशी झुंजणारे आजोबा, दुसऱ्यांकडे स्वंयपाकाची कामे करून घराला हातभार लावणारी आई, शिकणारी मोठी बहीण, शाळेत जाणारा भाऊ आणि रोजंदारीवर काम करणारे वडील… या पार्श्वभूमीवर सीए होण्याच्या स्वप्नासाठी आर्थिक गणित कसे जुळवायचे याची चिंता प्राची कोंडुसकर आणि कुटुंबीयांना सतावते आहे!

Maharashtra Times 11 Jul 2017, 11:13 pm
PRACHI VITHOBA KONDUSKAR
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prachi konduskar dreams to become ca needs financial help
सीए होण्याच्या स्वप्नाचा ताळेबंद


९१.८० टक्के

मटा हेल्पलाइन- प्राची कोंडुसकर

टीम मटा, मुंबई

आजाराशी झुंजणारे आजोबा, दुसऱ्यांकडे स्वंयपाकाची कामे करून घराला हातभार लावणारी आई, शिकणारी मोठी बहीण, शाळेत जाणारा भाऊ आणि रोजंदारीवर काम करणारे वडील… या पार्श्वभूमीवर सीए होण्याच्या स्वप्नासाठी आर्थिक गणित कसे जुळवायचे याची चिंता प्राची कोंडुसकर आणि कुटुंबीयांना सतावते आहे!

सांताक्रूझमधील कलिना येथे मराठा कॉलनीतील चाळीत छोट्याशा खोलीत कोंडुसकर कुटुंब राहते. गारमेंट कंपनीत रोजंदारी करणाऱ्या विठोबा कोंडुसकरांचे मासिक वेतन आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत आहे. घरी अनंत अडचणी, आर्थिक समस्या, घराबाहेरील आवाज-गोंधळ यावर मात करत एकलव्याप्रमाणे अजोड कष्टांची साथ देऊन प्राचीने दहावीत ९१.८० टक्के गुण मिळविले. मात्र, पुढील शिक्षणासाठी आर्थिक बेगमी कुठून करायची या विचाराने सारे कोंडुसकर कुटुंबीय चिंतेत आहे.

कोंडुसकर यांचे घर एसआरए प्रकल्पात समाविष्ट झाले आहे. मात्र, अद्याप नवे घर त्यांच्या ताब्यात मिळालेले नाही. त्यामुळे ते भाड्याच्या खोलीत राहतात. गल्ल्यांमधून वाट काढत कोंडुसकरांच्या घरी गेल्यावर मिणमिणत्या ट्युबलाइटचा प्रकाश जाणवतो. तिथल्याच एका पलंगावर आजारी असलेले आजोबा, बाहेरचा गोंधळ अशा स्थितीत प्राची आणि तिची दोन्ही भावंडे अभ्यास करतात.

वांद्रेतील महात्मा गांधी विद्यामंदिरमध्ये शिकलेली प्राची सेमी इंग्रजीची विद्यार्थिनी. लहानपणापासून अभ्यासात तल्लख असणारी प्राची ९१.०८ टक्के मिळवित कठीण स्थितीचा सामना करत आहे. केवळ वडिलांचा तुटपुंजा पगार आणि आईकडून मासिक दोन ते अडीच हजार रुपयांची मदत अशा परिस्थितीत शिक्षण घेणे अवघड होते. विठोबा कोंडुसकर यांना सीझनप्रमाणे, सणासुदीला जास्त पैसे मिळतात. इतर वेळी तुलनेने कमी पैसे मिळत असल्याचे ते सांगतात. प्राचीची मोठी बहीण एसवायबीबीआयच्या वर्गात आहे. छोटा भाऊ सातवीत शिकतो.

प्राचीच्या आजोबांचे वय ८४च्या आसपास आहे. फुफ्फुसाचा विकार आणि वयोमानाने येणाऱ्या आजारांमुळे औषधोपचारांचीही जबाबदारी येते. तिन्ही मुलांच्या शिक्षणासाठी सर्व कुटुंब काटकसर करत आहे. मुलीच्या हुशारीला वळण देण्यासाठी आता पैसा कसा उभा करायचा या समस्येमुळे आपण हतबल असल्याचे विठोबा कोंडुसकर डोळ्यांतील अश्रू लपवून सांगतात.

प्राचीला सीए व्हायची इच्छा असून तिला उत्तम शिक्षण मिळावे असा आमचाही प्रयत्न राहील. पण आर्थिक ​स्थिती नाजूक असून काही वेळा कर्जेही घेतली आहेत. एका प्रसंगी तर पत्नीचे दागिनेही विकावे लागल्याचेही ते सांगतात. प्राचीलाही कुटुंबाच्या त्यागाची पुरेपूर कल्पना आहे. सीए होण्यासाठी क्लासेस, महागडी पुस्तके यासाठी येणारा खर्च मोठा असल्याची चिंता तिच्या बोलण्यातून जाणवते. मात्र, तिचा आत्मविश्वास कायम आहे. स्वप्नपूर्तीसाठी कितीही कष्ट करण्याची तिची तयारी आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज