अ‍ॅपशहर

पुणेकरांनी करुन दाखवलं; करोनाने एकही रुग्णाचा मृत्यू नाही

शहरातील उपचाराधीन करोनाबाधितांची संख्या एक हजाराच्या आत आल्यानंतर पुणेकरांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 21 Oct 2021, 9:37 am
म. टा. प्रतिनिधी, पुणेः शहरातील उपचाराधीन करोनाबाधितांची संख्या एक हजाराच्या आत आल्यानंतर पुणेकरांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी. बुधवारी शहरात एकाही करोनाबळीची नोंद झालेली नाही. सहा फेब्रुवारीनंतर शहरात पहिल्यांदाच करोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune-coronavirus


करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही लाटांचा पुण्याला मोठा फटका बसला. राज्यातील करोनाचा पहिला रुग्ण नऊ मार्च २०२० रोजी पुण्यात आढळला. त्यानंतर बाधितांची संख्या वाढत गेली. ३० मार्च २०२० रोजी शहरात पहिल्या करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका दिवसात सर्वाधिक ६७ मृत्यूंची नोंद महापालिका हद्दीत झाली होती. लसीकरणाचा टक्का वाढू लागल्यानंतर लाटेचा प्रभावही कमी झाला. त्यामुळे बाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यूंची संख्याही आटोक्यात आली.

शहरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नसताना सलग दुसऱ्या दिवशी सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत नोंदली गेली आहे. बुधवारी शहरात ११२ नवबाधितांची नोंद झाली. मात्र, सक्रिय बाधितांची संख्या ९८८ इतकी नोंदली गेली आहे. सक्रिय बाधितांमध्ये १५१ गंभीर असून, १७८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत; तर १११ बाधित करोनामुक्त झाले आहेत.

'लसीकरणामुळे रुग्ण गंभीर होण्याचे किंवा त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होते. पुण्यात लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले असून, नागरिकांमध्ये 'हर्ड इम्युनिटी'ही आली आहे. त्यामुळे संसर्ग आटोक्यात आला असून, बुधवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही,' असे महापालिकेचे सहाय्यक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख