अ‍ॅपशहर

परळ टर्मिनस, स्कायवॉकही!

एल्फिन्स्टन रोड पुलावरील दुर्घटनेनंतर जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने स्थानक, प​रिसराचे सुरू केलेले ऑडिट सोमवारी पूर्ण झाले.

Maharashtra Times 10 Oct 2017, 4:00 am
मध्य-पश्चिम रेल्वेच्या ऑडिट अहवालातील शिफारशी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम railway panel recommends parel terminus and skywalk
परळ टर्मिनस, स्कायवॉकही!


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

एल्फिन्स्टन रोड पुलावरील दुर्घटनेनंतर जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने स्थानक, प​रिसराचे सुरू केलेले ऑडिट सोमवारी पूर्ण झाले. मध्य, पश्चिम रेल्वेवरील पाहणीतून पादचारी पुलांची बांधणी, अतिक्रमणे हटविणे, स्कायवॉक उभारणे अशा सूचना समोर आल्या आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या आदेशानुसार झालेल्या या ऑडिटमध्ये परळ टर्मिनस जलदगतीने उभारणे आवश्यक असल्याचाही निर्वाळा देण्यात आला आहे. तसेच सध्याच्या पुलाला समांतर स्कायवॉक बांधण्याचीही सूचना करण्यात आली आहे.

पश्चिम, मध्य रेल्वेवर ऑडिट करण्यासाठी १३ गटांतील सदस्यांनी सात दिवस पाहणी करून अंतिम अहवाल सोमवारी दोन्ही महाव्यवस्थापकांना सुपूर्द केला. या अहवालातील सूचना, निष्कर्षांचा आढावा घेऊन रेल्वे बोर्डाकडे धाडण्यात येईल. एल्फिन्स्टन रोड येथील तिकीट आरक्षण केंद्र अन्यत्र हलवणे व पुलाचे रुंदीकरण करणे शक्य असून, परळ टर्मिनस त्वरित आणि जलदगतीने पूर्ण होण्यास प्राधान्य द्यावे, असे या अहवालात म्हटले आहे. परळच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनवरून ए​ल्फिन्स्टन रोडला जाणाऱ्या पादचारी पुलाला समांतर स्कायवॉक बांधणे, त्यातील एक भाग प्लॅटफॉर्मकडे नेण्याची सूचना करण्यात आली आहे. पश्चिमेकडील अतिक्रमण काढून तिथे रस्ता मोकळा करणे, दादरच्या दिशेने स्कायवॉक बांधणे याकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

गर्दीच्या स्थानकांवर सुरक्षाबदल

० करी रोड : मुख्य पुलावरून तिकीट ​खिडकी आणि पादचारी पूल जोडला जात असल्याचा उल्लेख करत ही तिकीट खिडकी अन्यत्र स्थलांतरित करणे. पूर्व आणि पश्चिमेस जोडणारा पादचारी पूल बांधणे.

० दादर : पूर्व आणि पश्चिमेस सरकत्या जिन्यासह जोडणारा स्कायवॉक बांधता येऊ शकेल.

० चिंचपोकळी : भायखळा पुलाखालील (पूर्वेस) जागेकडे अतिक्रमणे झाले आहे. पश्चिमेकडील भागाकडेही अतिक्रमणे आहेत. प्लॅटफॉर्मच्या मधल्या भागाकडे पादचारी पुलाची आवश्यकता.

० सीएसएमटी : मशिद बंदरच्या​ दिशेने काही अंतरावर अतिक्रमणे असून ती काढण्यात यावी.

० मशिद बंदर : मुंबई पालिकेच्या अखत्यारीतील पुलाकडे मोठ्याप्रमाणात फेरीवाल्यांचा वावर. क्रमांक एकचा प्लॅटफॉर्म ज्या ठिकाणी संपुष्टात येतो, तिथे संरक्षक अडथळे उभारणे. पादचारी पुलास रंगकाम, स्वच्छता राखणे.

० सँडहर्स्ट रोड : हँकॉक पुलास पर्याय म्हणून दोन्ही बाजूस संरक्षक अडथळे उभारून रस्ता आणि त्यानंतर स्कायवॉक जोडणे. प्लॅटफॉर्मवर पंखे बसविणे.

० माटुंगा : झेड पुलाचे रुंदीकरण. प्रवेशद्वाराकडील दुकाने अन्यत्र स्थलांतरित करणे. प्रस्तावित पादचारी पूल जलदगतीने उभारणे.

० कुर्ला : प्लॅटफॉर्म क्र. ७, ८च्या टोकाकडील पूल अरूंद. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा दर्जा वाईट असून अतिरिक्त ४० कॅमेरा बसविणे. पश्चिमेकडे सार्वजनिक रस्त्यांवरील दुकाने अन्यत्र स्थलांतरित करणे.

० घाटकोपर : गर्दीचे नियोजन राखण्यासाठी कल्याण​ दिशेकडील तिकीट केंद्राकडील दुकाने अन्यत्र स्थलांतर करणे. पश्चिमेस प्लॅटफॉर्म क्रमांक एककडील पालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे पाडणे. रेल्वे सुरक्षा बलाकडे अतिरिक्त ४० सीसीटीव्ही कॅमेरे पुरविणे.

० विक्रोळी : रेल्वे मार्गिकेकडील समांतर अनधिकृत दुकाने हटवणे. प्लॅटफॉर्म क्रमांक एककडे कल्याण दिशेकडील अतिक्रमणे हटविणे.

० भांडुप : दोन नवीन पादचारी पूल बांधणे. कल्याण दिशेकडील काही अनधिकृत बांधकामे तोडणे. पूर्वेकडे झोपड्या आणि अन्य अतिक्रमणे हटविणे.

० मुलुंड : पश्चिमेकडे रेल्वे आणि पालिकेच्या हद्दीतील तिन्ही प्रवेशद्वाराकडील दुकाने स्थलांतरित करणे. आणखी एका पादचारी पुलाची निकड.

० ठाणे : सॅटिसकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे. पूर्वेस सॅटिस बांधण्याची ठाणे पालिकेची सूचना. कल्याण पश्चिमेकडे संरक्षक ​भिंत उभारणे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज