अ‍ॅपशहर

पावसाच्या हजेरीने गरबाप्रेमींची तारांबळ

दांडिया खेळण्यासाठी विविध ठिकाणी नटूनथटून पोहोचलेल्या मुंबईकरांचा दसऱ्याचा आदला दिवस पावसामध्ये भिजत साजरा झाला. दादरमध्ये काही ठिकाणी तुरळक पावसाने उपस्थिती लावली, तर उपनगरांमध्ये काही ठिकाणी विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह पाऊस पडला.

Maharashtra Times 18 Oct 2018, 3:00 am
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rains spoil the navratri mood
पावसाच्या हजेरीने गरबाप्रेमींची तारांबळ


दांडिया खेळण्यासाठी विविध ठिकाणी नटूनथटून पोहोचलेल्या मुंबईकरांचा दसऱ्याचा आदला दिवस पावसामध्ये भिजत साजरा झाला. दादरमध्ये काही ठिकाणी तुरळक पावसाने उपस्थिती लावली, तर उपनगरांमध्ये काही ठिकाणी विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह पाऊस पडला. मान्सून माघारी गेल्यानंतर अचानक पाऊस आल्याने नोकरदारांची आणि गरब्याचा आनंद घेण्यासाठी गरबास्थळी पोहोचलेल्यांची तारांबळ उडाली. मात्र या पावसाने अर्ध्या तासात विश्रांती घेत त्यांना दिलासा दिला. गुरुवारीही मुंबई आणि उपनगरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

कर्नाटकच्या किनारपट्टीवर हवेच्या खालच्या थरात निर्माण झालेली हवामानाची स्थिती आणि वाढलेले तापमान यामुळे दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, मराठवाडा येथे मंगळवारी ढगांची निर्मिती झाली. त्यामुळे या भागामध्ये सरीची शक्यता निर्माण झाली. मुंबईवरही अशा प्रकारचे ढग बुधवारी सायंकाळी दिसून आले. त्याच्या प्रभावाने मुंबई आणि नजीकच्या भागात पाऊस पडला. अशा प्रकारचा पाऊस गुरुवारीही पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. गडगडासह आलेला हा पाऊस दीर्घवेळ रेंगाळला नाही.

पनवेल येथे काही प्रमाणात पावसाचा जोर होता, मात्र मुंबईत तो फार पडला नाही. गडगडामुळे जोरदार पावसाची मुंबईकरांना भीती होती, मात्र या पावसाने अर्ध्या तासात माघार घेतली. गुरुवारीही फार मोठा पाऊस नसेल. मंगळवारी ३७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंद मुंबईत झाल्यानंतर बुधवारी मात्र सांताक्रूझ येथे तीन अंशांनी तापमानात घसरण दिसून आली. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३४.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर कुलाबा येथे हे तापमान ३३.४ अंश सेल्सिअस होते. कुलाबा येथे वातावरणात ८३ टक्के आर्द्रता होती, तर सांताक्रूझ येथे ५७ टक्के आर्द्रता होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज