अ‍ॅपशहर

नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या मतदानाबाबत अनिश्चितता

राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक आमदाराचं मत आता महत्त्वाचं ठरलं आहे. यामुळे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना या निवडणुकीत मतदान करता येणार का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 7 Jun 2022, 9:04 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी विधानभवनात जाण्याची मुभा मिळावी याकरिता नवाब मलिक व अनिल देशमुख या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केले आहेत. न्यायालयाने याविषयी सोमवारी प्राथमिक सुनावणी घेतल्यानंतर सक्तवसूली संचालनालयाला (ईडी) मंगळवारी (आज) उत्तर दाखल करण्याचे निर्देश देऊन बुधवारी (उद्या) सुनावणी ठेवली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajya sabha election maharashtra nawab malik and anil deshmukh
नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या मतदानाबाबत अनिश्चितता


मलिक व देशमुख हे मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाने दिलेल्या परवानगीप्रमाणे मलिक हे सध्या क्रिटिकेअर एशिया रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत आहेत. 'राज्यसभेत राज्यातील प्रतिनिधी जावेत यादृष्टीने १० जून रोजी राज्यातील विधानसभा आमदारांकडून विधानभवनात मतदान होणार आहे. निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने मतदान आवश्यक ठरले आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील रहिवाशांचे प्रतिनिधित्व व्हावे यादृष्टीने मतदान करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने वैद्यकीय निरीक्षणाखाली मला रुग्णालयातून विधानभवनात नेण्यास परवानगी द्यावी', अशी विनंती मंत्री मलिक यांनी अॅड. कुशल मोर यांच्यामार्फत दाखल केलेल्या अर्जात केली आहे. माजी गृहमंत्री देशमुख यांनीही आपल्याला मतदान करण्याची इच्छा असल्याचे सांगत आर्थर रोड तुरुंगातून एक दिवसासाठी सुटका करण्याची आणि पोलिस बंदोबस्तात विधानभवनात जाऊ देण्याची विनंती अर्जाद्वारे केली आहे.

'मलिक व देशमुख यांच्या अर्जांवर एकाच वेळी सुनावणी घ्यावी आणि दोघांच्या अर्जांवर ईडीला तातडीने उत्तर दाखल करण्यास सांगावे', अशी विनंती देशमुख यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयाला केली. मात्र, उत्तर दाखल करण्यासाठी एक दिवसाचा कालावधी आवश्यक आहे, असे म्हणणे ईडीतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी मांडले. त्यानंतर न्यायालयाने ईडीला एक दिवस देऊन दोन्ही अर्जांवर उद्या, बुधवारी सुनावणी ठेवली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज