अ‍ॅपशहर

अयोध्येत राममंदिर ​होणारच : सुब्रमण्यम स्वामी

अयोध्येत राममंदिर उभारण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच निकाल येईल आणि तो अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी अनुकूल असेल.

Maharashtra Times 18 Apr 2016, 3:33 am
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा पुनरुच्चार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ram mandir
अयोध्येत राममंदिर ​होणारच : सुब्रमण्यम स्वामी


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

अयोध्येत राममंदिर उभारण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच निकाल येईल आणि तो अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी अनुकूल असेल. या निकालानंतर अवघ्या तीन महिन्यांत अयोध्येत राममंदिर बांधले जाईल. पुढील वर्षी रामनवमीला हिंदू अयोध्येत श्रीरामनवमी साजरी करतील, असे वक्तव्य भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी केले.

विराट हिंदुस्थान संगम या कार्यक्रमानिमित्त स्वामी हे मुंबईत आले होते. अयोध्येतल्या वादग्रस्त राममंदिर प्रश्नासंदर्भात ते म्हणाले, अयोध्येत राममंदिर उभारण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय अपेक्षित आहे. केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल डी. राजागोपालन यांनी सर्वोच्च न्यायालयात अयोध्येत १५२८ पूर्वी राममंदिर होते, याचे पुरावे सादर केलेले आहेत. त्यानंतर ते मंदिर पाडले गेले. त्यामुळे निर्णय राममंदिराच्या बाजूने लागेल, याची खात्री आहे. या प्रकरणाची सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. मुस्लिम नेत्यांचीही आता अयोध्येत राममंदिर व्हावे, यासाठी सहमती आहे, असे ते म्हणाले.

न्यायालयाच्या निकालानंतर तीन महिन्यांतच राममंदिर अयोध्येत बांधले जाईल. अयोध्येबरोबर मथुरेत श्रीकृष्णाचे मंदिर, काशी विश्वनाथाचे अलाहबादेत मंदिर ही आमची मागणी आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत, असेही स्वामी म्हणाले. माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि नरसिंहराव यांच्या चुकीच्या धोरणामुळेच अयोध्येतील राममं​दिर प्रकरण चिघळले, असा आरोपही स्वामी यांनी केला.

परदेशी बँकांमधील काळा पैसा आणण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते, त्यासंदर्भात स्वामी म्हणाले, परदेशी बँकांमधील काळापैसा तात्काळ आणणे शक्य नाही. केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. पुढील तीन वर्षांत याबाबत तातडीने कार्यवाही होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज