अ‍ॅपशहर

विहिंप-सेनेत ‘रामायण’

राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करण्याचा शिवसेना प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून, नुसत्या पत्रकार परिषदा घेऊन राम मंदिर बनत नाही. शिवसेनेने आधी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधावे; त्यानंतरच अयोध्येकडे लक्ष द्यावे, अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी रविवारी केली.

Maharashtra Times 12 Nov 2018, 4:13 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ram-temple


राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करण्याचा शिवसेना प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून, नुसत्या पत्रकार परिषदा घेऊन राम मंदिर बनत नाही. शिवसेनेने आधी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधावे; त्यानंतरच अयोध्येकडे लक्ष द्यावे, अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी रविवारी केली, तर केंद्रात पूर्ण बहुमताच्या सत्तेत असलेल्या भाजप सरकारवर साडेचार वर्षांत राम मंदिर बांधण्यासाठी विहिंप आणि संघ परिवाराने का दबाव निर्माण केला नाही, असा सवाल सेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केला.

विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कोकजे यांनी सेनेच्या आगामी अयोध्या दौऱ्यावर टीका केली. इतक्या वर्षांनी शिवसेनेला अचानक कसा काय हा मुद्दा आठवला, अयोध्येत शिवसेनेची किती ताकद आहे, मुंबईत परप्रांतीयांना झोडायचे आणि तिकडे उत्तर भारतातील अयोध्येत जायचे. त्या हिंदीभाषकांना उद्धव काय उत्तरे देणार, असे सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले. दरम्यान, राम मंदिरच्या मुद्द्यावर भाजप केंद्रात पूर्ण बहुमतात सत्तेवर आली. त्या भाजपवर साडेचार वर्षांत विहिंप आणि संघाने मंदिरउभारणीसाठी दबाव का टाकला नाही, असा पलटवार कायंदे यांनी केला. भाजप राममंदिर उभारू शकत नाही हे दिसू लागल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शरयू नदीच्या काठावर रामाचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला, असा टोलाही यांनी लगावला.

संत-महंतांच्या आग्रहाखातर...

अयोध्येत भाजप राम मंदिर उभारू शकत नसल्यामुळे संत-महंतांनी मातोश्री निवासस्थानी भेट देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अयोध्येला येण्याची विनंती केली होती. त्या विनंतीवरूनच ते अयोध्येला जात आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आम्ही बांधतच आहोत. त्यासाठी लागणाऱ्या जागेचे हस्तांतरण होण्यासाठी काही तांत्रिक बाबींमुळे थांबलो आहोत, असे कायंदे यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज