म. टा. प्रतिनिधी, मुंबई
'आगामी काळ परीक्षांचा आहे. लवकरच दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू होतील. यामुळे आगार व्यवस्थापकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक-प्राचार्यांना भेटून त्या प्रमाणे एसटी फेऱ्यांचे नियोजन करावे. अशा फेऱ्या वेळेवर चालवण्याला प्राधान्य द्या,' अशा सूचना परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅ़ड. अनिल परब यांनी दिल्या आहेत.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात वाहतूक विभागाचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री परब यांनी विशेष बैठक बोलावली होती. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. या बैठकीत, परीक्षेच्या वेळेप्रमाणे एसटी फेऱ्यांचे नियोजन करून त्या वेळेवर चालवण्याच्या सूचना परब यांनी महामंडळातील अधिकाऱ्यांना दिल्या. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रवासीभिमुख योजना राबवा तसेच प्रवाशांच्या तक्रारींना सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांचा तक्रारीचा तातडीने निपटारा करण्यासाठी प्रयत्नशील राहा, असे आदेशही या बैठकीत देण्यात आले