अ‍ॅपशहर

तुम्ही स्वतः सुरतला गेला असता तर…; राऊतांनी प्रश्न विचारताच उद्धव ठाकरेंकडून बंडखोरांवर प्रश्नांची सरबत्ती

Uddhav Thackeray News : भाजपसोबत झालेल्या संघर्षाची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना फटकारलं आहे. तसंच अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jul 2022, 7:41 am
मुंबई : शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला पक्षातीलच आमदारांच्या बंडखोरीमुळे सत्तेवरून पायउतार होण्याची नामुष्की ओढावली. मात्र आमदार नाराज होऊन सर्वप्रथम सुरतला गेले तेव्हाच हे बंड मोडून काढण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे हे सुरतला गेले असते तर चित्र बदललं असतं का, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. याच प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी दैनिक 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav thackeray interview new 1
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे


'लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की, स्वतः उद्धव ठाकरे सुरतला गेले असते तर...?' असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारताच उद्धव ठाकरेंनी कशासाठी? असा प्रतिप्रश्न केला आणि आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली. 'माझ्या मनात पाप नव्हतं. मी तुम्हाला बोलवत होतो की, माझ्यासमोर येऊन बसा, बोला. की समजा राष्ट्रवादी तुम्हाला त्रास देतेय. मी त्यांना या शब्दांत सांगितलं होतं की, ज्या आमदारांना २०१४ साली भाजपने दगा दिला तरीसुद्धा भाजपसोबत जायचंय? पण आम्ही गेलो भाजपबरोबर. २०१९ सालीसुद्धा आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही. शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी याच आमदारांविरुद्ध भाजपने त्यांचे बंडखोर उभे केले होते असे याच आमदारांचे म्हणणे आहे. त्यांचेच अनुभव आहेत. म्हणजे भाजपला तेव्हा आणि आताही शिवसेना संपवायचीच होती. त्यांच्याबरोबर हे गेले,' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना फटकारलं आहे.

"भाजप बाहेरुन आलेल्यांना सर्व काही मिळतं, म्हणून..." निष्ठावंतांच्या मनातलं ठाकरेंनी सांगितलं

भाजपसोबत गेलेल्या आमदारांवर प्रश्नांची सरबत्ती

शिवसेनेतील आमदारांना घेऊन बंड करण्याआधी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना भेटून भाजपसोबत जाण्याची विनंती केली होती. याबाबत माहिती देताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना अनेक प्रश्न विचारले आहेत. 'मला असं सांगण्यात आलं, काही आमदारांचा दबाव आहे की, आपल्याला भाजपसोबत जायचंय. मी म्हटलं, अशा सगळय़ा आमदारांना आणा माझ्यासोबत. दोन-तीन प्रश्न माझ्या मनात आहेत. एक म्हणजे कारण नसताना शिवसैनिकांना ईडीपिडी लावली. छळ चाललाय. ते हिंदुत्वासाठी त्या वेळेला दंगलीत लढलेले शिवसैनिक ज्यामध्ये अनिल परब असतील किंवा हिंदुत्वाची बाजू लावून धरलेले तुम्ही असाल, यांना तुम्ही एकदम छळायला लागलात. हा छळ कुठपर्यंत चालणार. कारण नसताना… असा यांचा काय मोठा गुन्हा आहे? दुसरी गोष्ट, त्यावेळी जे ठरवून नाकारले त्याचे यावेळी भारतीय जनता पक्ष आता काय करणार? शिवसेनेला सन्मानाची वागणूक कशी देणार? तिसरी गोष्ट मला आमदारांना विचारायचीय, खासदारांना मी त्या दिवशी 'मातोश्री'वरच्या बैठकीत विचारलीय की, गेली अडीच वर्षे कोणी हिंमत केली नाही असं बाळासाहेबांच्या कुटुंबीयांवर 'मातोश्री'वर अश्लाघ्य भाषेत बोललं गेलंय, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात? मधल्या काळात तुम्ही का बोलला नाहीत, की आम्हाला हे मान्य नाही. एवढं सगळं तुमच्या नेत्यांच्या कुटुंबीयांबद्दल, घराबद्दल, नेत्याबद्दल, 'मातोश्री'बद्दल बोलूनही तुम्ही शेपट्या घालून जाणार?' असे खरमरीत प्रश्न उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना विचारले आहेत.

Shivsena: तुम्ही घाणेरड्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद मिळवलंत, तुम्हाला सत्ता लाभणार नाही: उद्धव ठाकरे

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा काल पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर बंडखोर गटाकडून आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं होतं. आजही उद्धव ठाकरे यांच्याकडून टीकेचे बाण सोडण्यात आल्यानंतर ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कोणता नेता समोर येतो, हे पाहावं लागेल.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख