अ‍ॅपशहर

…तर तुरुंगामध्येच साहित्य संमेलन होईल!

‘विष्णू सूर्या वाघ यांची जाणीव चौफेर आहे. कलावंत असून राजकारणाचे प्रगल्भ ज्ञान आहे. हे त्यांचे ज्ञान कलेत उतरते. राजकारणी व्यक्तीला कविता कळत असेल तर त्याचा उपयोग समाज अधिक समृद्ध करण्यासाठी होईल.

Maharashtra Times 26 Oct 2017, 6:32 am
विष्णू वाघांविरोधातील एफआयआरच्या निषेधातील सूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sahitya sammelan in prison
…तर तुरुंगामध्येच साहित्य संमेलन होईल!


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

‘विष्णू सूर्या वाघ यांची जाणीव चौफेर आहे. कलावंत असून राजकारणाचे प्रगल्भ ज्ञान आहे. हे त्यांचे ज्ञान कलेत उतरते. राजकारणी व्यक्तीला कविता कळत असेल तर त्याचा उपयोग समाज अधिक समृद्ध करण्यासाठी होईल. मात्र, अशा पद्धतीने जुन्या साहित्यावर आक्षेप घेऊन पोलिसांत तक्रार नोंदवली जाऊ लागली तर मग तुरुंगातच साहित्य संमेलन होईल’, असा टोला कवी सौमित्र यांनी पोलिस आणि गोवा सरकार यांना बुधवारी लगावला. विष्णू वाघ यांच्याविरोधात नोंदवलेल्या तक्रारीला विरोध करण्यासाठी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या निषेध कार्यक्रमात ते बोलत होते. वाघ यांच्या कविता वाचून यावेळी निषेध नोंदवण्यात आला.

‘काही वर्षांपूर्वीच्या कवितांविरोधात तक्रार नोंदवली जात असेल तर संत तुकाराम, नामदेव ढसाळ, बाबूराव बागुल यांच्याविरोधातही अनेक तक्रारी नोंदवाव्या लागतील’, असेही मत सौमित्र यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. या निषेध कार्यक्रमात त्यांनी गांधी आणि सेक्युलर या वाघ यांच्या दोन कविता सादर केल्या. ‘समाजातील विषमता, विद्रोह मांडण्याचा हक्क प्रत्येकाला आहे’, असे सांगत स्त्रियांनीसुद्धा अशा पद्धतीची भाषा वापरली आहे, असे कवयित्री नीरजा यांनी स्पष्ट केले. ‘सध्या मोकळेपणाने लिहायचे की जपून लिहायचे, असा प्रश्न निर्माण झाला असून, जपून लिहिले तर आत साठलेले बाहेर येणार नाही, त्यामुळे मोकळेपणाने लिहा’, असा धीर त्यांनी दिला. त्यांनी यावेळी हरदास ही वाघ यांची कविता उपस्थितांना ऐकवली.

‘महाराष्ट्र टाइम्स’चे ज्येष्ठ पत्रकार इब्राह‌मि अफगाण यांनी या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी विषद केली. ‘निषेध करणारे वादाच्या बाजूने नाहीत तर संवादाच्या बाजूने आहेत’, असाही खुलासा अफगाण यांनी केला. या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी वाघ यांच्या ‘फरक’ या सध्या वादग्रस्त ठरलेल्या कवितेने केली. या निषेध कार्यक्रमाचे आयोजक ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारपर्यंत आवाज पोहोचवत असल्याचे सांगितले. ‘वाघ यांच्याविरोधात नोंदवलेली तक्रार मागे घ्यावी आणि त्यांची माफी मागावी’, अशीही मागणी त्यांनी केली. ‘राज्य सरकारने गोवा सरकारला यासंदर्भात कळवावे’, असेही ते म्हणाले. ‘सूदिरसूक्त’मधील कविता सध्याच्या काळाशी सुसंसगत आहेत. अशा कवितांविरोधात, कवी आणि प्रकाशकाविरोधात तक्रार नोंदवण्याआधी त्या किमान वाचाव्यात, असे या निषेध कार्यक्रमात जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज