अ‍ॅपशहर

समीर वानखेडेंनीच माझ्या घरात ड्रग्ज ठेवले; २० वर्षीय तरुणाचा जामीन अर्जात दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या आरोपांमुळं गोत्यात आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आणखी एका तरुणानं धक्कादायक आरोप केला आहे.

Authored byगणेश कदम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Nov 2021, 4:55 pm
मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे खंडणीखोरीच्या आरोपांमुळं संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले असतानाच, त्यांच्या विरोधात आणखी एक प्रकरण पुढं आलं आहे. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या एका २० वर्षीय तरुणानं वानखेडे यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. व्यक्तिगत वादातून वानखेडे यांनीच माझ्या घरात ड्रग्ज ठेवल्याचा आरोप करत या तरुणानं न्यायालयाकडं जामिनाची विनंती केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sameer Wankhede
समीर वानखेडे


झैद राणा असं या तरुणाचं नाव आहे. एप्रिल महिन्यात झैदच्या ओशिवरा येथील घरातील ड्रॉवरमध्ये व स्कूटरवर मॅरिजुआना, चरस व इतर अमलीपदार्थ एनसीबीनं जप्त केल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणी राणा व त्याचा मित्र सोनू फैजला अटक करण्यात आली. आता आर्यन खान प्रकरणानंतर वानखेडे यांच्यावर आरोप होऊ लागल्यावर धाडस करून संबंधित तरुणानं आपल्या जामीन अर्जात हा आरोप केला आहे. व्यक्तिगत शत्रुत्व काढण्यासाठी वानखेडे यांनी हे सगळं केल्याचं त्यानं म्हटलं आहे.

वाचा: कोर्टात मुख्यमंत्र्यांच्या तब्यतीचे कारण देत सरकारनं 'हा' निर्णय टाकला लांबणीवर

झैद राणा राहत असलेल्या घराशेजारीच वानखेडे कुटुंबाचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट भाड्यानं दिलेला आहे. वानखेडे यांचे भाडेकरू व झैद राणा याच्या आई-वडिलांमध्ये काही कारणावरून क्षुल्लक वाद झाला होता. त्या भांडणाचा राग मनात ठेवून वानखेडे यांनी मला ड्रग्ज प्रकरणात अडकवलं. वानखेडे यांनी स्वत: माझ्या घरात ड्रग्ज ठेवलं होतं, असा आरोप झैद राणानं केला आहे. या प्रकरणात ऑक्टोबरमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं. त्यात अनेक चुकीचे दावे करण्यात आले आहेत. समीर वानखेडे हे घटनास्थळी उपस्थित असतानाही तसं नमूद करणं सोयीस्करपणे टाळण्यात आलं आहे. मात्र, इमारतीमधील सीसीटीव्ही फूटेज तपासल्यास सत्य समोर येईल. त्यामुळं संबंधित ठिकाणाचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घ्यावं, अशी मागणी आरोपींनी अन्य एका अर्जाद्वारे केली आहे. त्याचबरोबर हे प्रकरण वानखेडे यांचा संबंध नसलेल्या एखाद्या यंत्रणेकडं सोपवावं, अशी मागणीही आरोपींनी केली आहे.

झैद राणा याच्या जामीन अर्जावर एनसीबीनं उत्तर दाखल करावं, असे निर्देश विशेष एनडीपीएस कोर्टानं दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी शनिवारी होणार आहे.

इथंही आर्यन खान प्रकरणातीलच पंच

आर्यन खान प्रकरणात ज्या लोकांना पंच साक्षीदार म्हणून उभं करण्यात आलं होतं, तेच लोक झैद राणाच्या प्रकरणातही पंच साक्षीदार म्हणून दाखवण्यात आले होते. मात्र, अनेक प्रकरणं चव्हाट्यावर येऊ लागल्यावर वानखेडे यांनी खोटा आणि बनावट अहवाल तयार करून पंच साक्षीदार बदलले आहेत. त्याशिवाय, त्याच इमारतीतील एका व्यक्तीला पंच साक्षीदार बनवण्यात आलं होतं. ती व्यक्ती एनसीबीमध्येच कार्यरत असल्याचं दाखवण्यात आलं होतं, मात्र या इमारतीतील कोणतीही व्यक्ती एनसीबीमध्ये नाही, असा दावाही राणाचे वकील अॅड. अशोक सरोगी यांनी जामीन अर्जात केला आहे.

वाचा: अनिल देशमुख यांना कसे गोवले गेले?; नवाब मलिक यांनी सांगितला घटनाक्रम

महत्वाचे लेख