अ‍ॅपशहर

Sanjay Raut: पंकजा मुंडेंचं ते वाक्य ऐकताच संजय राऊत उसळून म्हणाले, ' राजकारणात टिकायचं असेल तर'

Maharashtra Politics: आज गोपीनाथ मुंडे साहे असते तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. पंकजा मुंडे यांनीच आता साहसी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Authored byरोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jun 2023, 12:27 pm

हायलाइट्स:

  • गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजप उभा केला
  • त्या मुंडे परिवाराचं अस्तित्त्व राजकारणात राहू नये, यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्रात मोठ्या हालचाली
  • मुंडे परिवाराच्या प्रमुख लोकांनी साहसाने निर्णय घेणे गरजेचे
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
मुंबई: मला राजकारणात काहीच मिळालं नाही तर मी ऊस तोडायला जाईन. महादेव जानकर मेंढ्या वळायला जातील. मला कसलीच चिंता नाही, असे वक्तव्य भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु असतानाच आता संजय राऊत यांनी त्यांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या आहेत. ते गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की, पंकजा मुंडे या भाजपमध्ये आहेत, पण त्यांना भाजप आपलं मानत नाही. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजप उभा करण्यासाठी रक्ताचं पाणी केले. त्या मुंडे परिवाराचं अस्तित्त्व राजकारणात राहू नये, यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरु आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे राजकारणात असणाऱ्या मुंडे परिवाराच्या प्रमुख लोकांनी साहसाने निर्णय घेणे गरजेचे आहे. राजकारणात हिंमतीने निर्णय घेण्याची गरज असते. परिणामांची पर्वा न करता निर्णय घेतले तरच राजकारणात टिकता येते. माझ्यावर अन्याय होतोय, अशा नेहमीच्या रडगाण्याला कोणी विचारत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. पंकजा मुंडे यांचा गेल्या निवडणुकीत पराभव का व कसा झाला?, हे सांगण्याची आता गरज नाही. भाजप परिवारातच आता मुंडे परिवाराविरोधात राजकारण सुरू आहे. काहीही असले तरी आमची मुंडे परिवाराविषयी आस्था कायम राहील, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

धनुभाऊ म्हणाले, 'पंकजाताई जर भगवान गडाची पायरी तर मी त्या पायरीचा दगड'; मुंडे बहीण भावाचं मनोमिलन झालं?


पंकजा मुंडे यांनी नेमकं काय म्हटलं होतं?


पंकजा मुंडे यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात खळबळ उडवून देणारी वक्तव्यं केली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित होते. यावेळी पंकजा यांनी म्हटले की, तुम्ही म्हणताय ताईची पार्टी ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण तो मोठा पक्ष आहे. मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल. महादेव जानकर जातील मेंढ्या वळायला. अजून काय आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
लेखकाबद्दल
रोहित धामणस्कर
रोहित धामणस्कर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | लोकसत्ता, झी २४ तास, टीव्ही ९ मराठीसह डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ९ वर्षांचा अनुभव | सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख