अ‍ॅपशहर

अजित पवारांच्या उपस्थितीत शिवसेना- राष्ट्रवादीची गुप्त बैठक; नेमकं काय घडलं?

महाविकास आघाडी सरकार स्थिर राहावे, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची गोपनीय बैठक झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Authored byसंजय व्हनमाने | महाराष्ट्र टाइम्स 2 Jul 2021, 7:49 am
मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थिर राहावे, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची गोपनीय बैठक झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनात भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापनेचा विचार असल्यास तसे घडू नये, यासाठी बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम अजित पवारांच्या उपस्थितीत शिवसेना- राष्ट्रवादीची गुप्त बैठक; नेमकं काय घडलं?


मोदी आणि ठाकरे यांच्यात आठ जून रोजी दिल्लीमध्ये अर्धा तास भेट झाली. त्यामुळे भविष्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला डच्चू देऊन भाजपसोबत सरकार स्थापन करील का, याविषयी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी महत्त्वाची बैठक नुकतीच झाली. त्याच दरम्यान 'राष्ट्रवादी'चे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानीही पक्षनेत्यांमध्ये बैठक झाली. त्यानंतर लगेचच त्याच रात्री ९ ते ११ दरम्यान मुंबईतील पश्चिम उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची ही गोपनीय बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे; तर शिवसेनेकडून नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. 'भाजपने काहीही सांगितले तरी महाविकास आघाडीसोबत राहाण्यातच शिवसेनेचे भले आहे. भाजपसोबत राहून तुम्हाला अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपदही मिळाले नाही; मात्र या सरकारमध्येच ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची पाच वर्षे पूर्ण करू शकतील,' असा विश्वास या वेळी अजित पवार यांनी शिवसेना नेत्यांना दिल्याचे समजते.

यातच आपले भले


'ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांची नाराजी असली; तरीही सध्याच्या सरकारमध्येच राष्ट्रवादी व शिवसेनेचे भले आहे. हे सरकार पडले आणि पुन्हा भाजपला सत्ता मिळाली, तर सगळी समीकरणे बिघडतील, असा सूर या बैठकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी लावला होता,' असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज