अ‍ॅपशहर

वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं शेअर केला खास व्हिडिओ

Shiv Sena Foundation Day: शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन येत्या १९ जून रोजी साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या आजवरच्या वाटचालीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jun 2021, 3:23 pm
मुंबई: गेल्या पाच दशकांपासून राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या व वेगवेगळ्या भूमिका बजावणारी शिवसेना शनिवारी, १९ जून रोजी ५५ वा वर्धापन दिन (Shiv Sena Foundation Day) साजरा करत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरचा हा दुसरा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाचं औचित्य साधून शिवसेनेनं एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळं मुख्य सोहळ्याबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Balasaheb Thackeray


करोनाच्या संकटामुळं मागील वर्षीच्या वर्धापनदिनाचा सोहळा ऑनलाइन घेण्यात आला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईतील वातावरण सुरक्षित असल्यानं शिवसेनेचा वर्धापन दिनाचा सोहळा तुलनेनं मोठा होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ शेअर करून शिवसेनेनं तसे संकेतच दिले आहेत.


वाचा: भाजपला धक्का! माजी आमदार डॉ. सुनील देशमुख काँग्रेसच्या वाटेवर

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पक्षाच्या ५५ वर्षांच्या वाटचालीचा अत्यंत थोडक्यात आढावा घेण्यात आला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला '५५ वर्षे एकनिष्ठेची' असं म्हणत, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचे काही अंश दाखवण्यात आले आहेत. त्यात बाळासाहेब हे 'शिवसैनिक' हा संघटनेसाठी किती महत्त्वाचा आहे हे सांगताना दिसत आहेत. त्यानंतर '५५ वर्षे जनसेवेची' असं नमूद करताना शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे काही अंश दाखवण्यात आले आहेत. त्यात उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तळमळीनं बोलताना दिसत आहेत. तर, व्हिडिओच्या शेवटच्या भागात '५५ वर्षे नवविचारांची' असं शिवसेनेच्या वाटचालीचं वर्णन करण्यात आलं आहे. या भागात शिवसेनेचे युवा नेते तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे राज्याच्या विधानसभेत आपले विचार मांडताना दिसत आहेत. प्लास्टिक बंदीच्या निमित्तानं पर्यावरणाचं महत्त्व सांगत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

वाचा: वाद मिटला?; राज्यपालांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री राजभवनावर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज