अ‍ॅपशहर

सेना-भाजपचे आता श्रेयासाठी रंगले ट्विटयुद्ध

अग्रलेख, वक्तव्यं आणि पोस्टरच्या माध्यमातून एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढल्यानंतर, आता शिवसेना भाजप ट्विरच्या माध्यमातून आपसात भिडले आहेत. निमित्त झालं ते जलयुक्त शिवार योजनेचं.

Maharashtra Times 13 Jun 2016, 7:12 pm
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsena bjp fight through twitter for credit
सेना-भाजपचे आता श्रेयासाठी रंगले ट्विटयुद्ध


अग्रलेख, वक्तव्यं आणि पोस्टरच्या माध्यमातून एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढल्यानंतर, आता शिवसेना भाजप ट्विटरच्या माध्यमातून आपसात भिडले आहेत. निमित्त झालं ते जलयुक्त शिवार योजनेचं.

परभणी जिल्ह्यात पाऊस पडल्यानंतर दुधगावात झालेल्या जलयुक्त कामाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून कौतुक केलं. या पावसाचे फोटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत, जलयुक्त शिवारामुळे पाणी वाहू लागल्याचं म्हटलंय.



मुख्यमंत्र्यांच्या ट्विटनंतर भाजपला पाण्यात पाहणारी शिवसेना गप्प बसेल, तरच नवल! शिवसेनेनंही उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात काल मोठा पाऊस झाल्यानंतर शिवसेनेनं देखील शिवजलक्रांतीने केली दुष्काळावर मात, असं ट्विट करत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला.



शिवजलक्रांतीचा परांडा पॅटर्न असं म्हणत शिवसेनेनं ट्विटद्वारे पाणी वाहू लागल्याचं श्रेय स्वत:कडे घेत आपली बाजू मांडण्यात आघाडी घेतली. ‘उद्धव साहेबांनी लोकार्पण केलेल्या उल्फा नदीला महापूर..!’ ‘लोकांमध्ये दिवाळी साजरी..!’ ‘अखेर शिवजलक्रांतीने केली दुष्काळावर मात..!’ अशा वाक्याचा मग ट्विटरवर मुसळधार पाऊसच कोसळू लागला.

शिवसेनेनं पुढे म्हटलंय -

इतिहासात पहिल्यांदाच गावांचा संपर्क तुटला... परांडा तालुक्यात अभूतपूर्व पाणी..! नद्या दुथडी भरल्या, विहिरीतून पाणी ओसंडून वाहू लागले..!! दुष्काळंच गायब..!



जलयुक्त शिवार योजनेच्या यशाचं श्रेय आपलंच आहे अशी भूमिका ट्विटवर दोन्ही पक्षांकडून ठासून मांडण्यात आली. या निमित्तानं सोशल मीडियाच्या युगातील प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटच्या मैदानावरही दोन्ही पक्षांनी दंड थोपटत आपलं युद्ध पुढं नेल्याची चर्चा मात्र सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज