अ‍ॅपशहर

'एक दिवस सरकारचाही आकस्मिक मृत्यू होईल'

'नव्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात ३ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार अशा प्रकरणांची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून दूरदर्शनवर गप्पा मारत आहे. हे असेच सुरू राहिल्यास एक दिवस सरकारच्या मृत्यूचीही आकस्मिक अशी नोंद करावी लागेल. लाखो शेतकऱ्यांचे शाप उत्पात घडविल्याशिवाय राहणार नाहीत,' असा सूचक इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

Maharashtra Times 18 Apr 2017, 9:37 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsena chief uddhav thackeray targets fadnavis over farmer suicide
'एक दिवस सरकारचाही आकस्मिक मृत्यू होईल'


'नव्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात ३ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार अशा प्रकरणांची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून दूरदर्शनवर गप्पा मारत आहे. हे असेच सुरू राहिल्यास एक दिवस सरकारच्या मृत्यूचीही आकस्मिक अशी नोंद करावी लागेल. लाखो शेतकऱ्यांचे शाप उत्पात घडविल्याशिवाय राहणार नाहीत,' असा सूचक इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

जालन्यात नुकतीच दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शिवसेनेनं या आत्महत्यांचं निमित्त करून फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. 'सामना'तील अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना विरोधी पक्षात असतानाच्या दिवसांची आठवण करून दिली आहे. मुख्यमंत्री स्वतःला तरी गांभीर्याने घेत असतील तर ‘मी तोच देवेंद्र फडणवीस आहे व शब्दाला जागणारा आहे’ असे त्यांनी दाखवून द्यायला नको का?,' असा सवाल उद्धव यांनी केला आहे.

काय म्हणतात उद्धव ठाकरे...

>> गेल्या पाच-पंचवीस वर्षांत शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांचा धुरळा हजारदा उडाला आहे व तो उडत असताना तेव्हा विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी करीत होते. याचा त्यांना आता विसर पडला आहे.

>> मुख्यमंत्री आता म्हणतात, कर्जमाफी शक्य नाही. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या खरेच थांबतील काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे. काँग्रेसचे सरकार घालवा. आम्हाला सत्ता द्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवतो, असा शब्द देणारे कोण होते हो?

>> कधीकाळी सध्याचे मुख्यमंत्री आक्रमक भाषेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करीत होते. विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री होतो तेव्हा रंग बदलतो, या टीकेतून आणि समजातून फडणवीस यांनी स्वतःला बाहेर काढले पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे सरकारला चिंता वाटत असेल तर दूरदर्शनवरील गप्पाष्टकांच्या बाहेर पडून गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहायला हवे.

>> मुख्यमंत्री ‘सह्याद्री’ वाहिनीवर ‘मन की बात’ बोलत असताना जालना, सांगली, नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रोज किमान पाच ते दहा शेतकरी आत्महत्या करतात. महिनाकाठी हा आकडा शंभरावर जातोय. नवीन सरकारच्या काळात ३ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात हे चित्र महाराष्ट्राबरोबरच आपल्या मोदी सरकारलाही भूषणावह नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रांचे ‘रोड शो’ केले तर जगात आमच्या राज्यकर्त्यांची ‘छी थू’ होईल.

>> जालन्यातील ज्या शेतकरी दांपत्याने आत्महत्या केली त्यामागचे कारण तरी समजून घ्या. रामजीच्या नावावर सहा एकर तर त्यांच्या पत्नीच्या नावावर तीन एकर शेतजमीन आहे. शेतीसाठी त्यांनी बँकेकडून साडेतीन लाखांचे कर्ज घेतले होते; परंतु त्याची परतफेड करणे शक्य नव्हते. शेतीसाठी पाइपलाइन, ठिबक सिंचन संचासाठी त्यांना आणखी कर्जाची आवश्यकता होती, परंतु आधी घेतलेल्या कर्जाची थकबाकी असल्याने बँकेकडून पुन्हा कर्ज मिळण्याची शक्यता नव्हती हे साधे गणित आहे. मग मुख्यमंत्र्यांनी ज्या ठिबक सिंचन, अखंड वीज वगैरे घोषणा केल्या त्या काय शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रांची रोषणाई करण्यासाठी?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज