अ‍ॅपशहर

Rana VS Kadu: रवी राणा त्यांच्या 'श्रीरामा'ची मान्यता असल्याशिवाय बच्चू कडूंवर आरोप करतील? ठाकरे गटाचा सवाल

Maharashtra Politics | कालपर्यंत आपली ओळख शेतकरी-कष्टकऱ्यांचा कैवारी, दिव्यांगांना मदत करणारा आमदार अशी होती, पण आता एखाद्या लग्नात गेलो तरी ‘आला आला, खोकेवाला आला’ असे हिणवले जाते. हे आता सहन करता येणार नाही. आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या 'श्रीरामा'ची मान्यता असल्याशिवाय?

Authored byरोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | 3 Nov 2022, 10:55 am

हायलाइट्स:

  • बच्चू कडूंकडून कोथळा बाहेर काढण्याचा इशारा
  • रवी राणा यांचा बोलविता धनी कोण
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Bacchu Kadu & Ravi Rana
बच्चू कडू आणि उद्धव ठाकरे
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टामुळे बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटल्याचे बोलले जात होते. परंतु, बच्चू कडू यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. हा वाद पुन्हा चिघळण्याच्या मार्गावर असतानाच आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे. बच्चू कडू यांनी रवी राणा (Ravi Rana) यांचा राम कोण आहे आणि बोलविता धनी कोण आहे, याचा शोध घ्यावा. कडू यांनी हा शोध घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल, असे 'सामना'त म्हटले आहे.
रवी राणा हे देवेंद्र फडणवीस यांना मानणारे आमदार आहेत. ते पक्के हनुमान भक्त आहेत. संकट आले आणि सत्य बोलायचे असेल तर ते हनुमान चालीसा वाचतात व बेभानपणे आरोपांची गदा फिरवतात. हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? एकवचनी, सत्यवचनी रामाचा भक्त बजरंगबलीचे नाव घेऊन खोटे कसे बोलू शकेल? त्यामुळे रवी राणा यांचा बोलविता धनी कोण, याचा शोध बच्चू कडू यांनी घेतला पाहिजे, असा सल्ला ठाकरे गटाने देऊ केला आहे.
सत्ता गेली चुलीत, आता चुकीला माफी नाही; सत्ताधाऱ्यांना इशारा देत कार्यकर्त्यांसमोर बच्चू कडू कडाडले!
बच्चू कडू यांची वेदना समजून घेतली पाहिजे. कडू म्हणतात, कालपर्यंत आपली ओळख शेतकरी-कष्टकऱ्यांचा कैवारी, दिव्यांगांना मदत करणारा आमदार अशी होती, पण आता एखाद्या लग्नात गेलो तरी ‘आला आला, खोकेवाला आला’ असे हिणवले जाते. हे आता सहन करता येणार नाही. आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या 'श्रीरामा'ची मान्यता असल्याशिवाय? उद्या खोकेवाल्यांच्या घरात नातं जुळवायचं म्हटलं तरी लोक मागे हटतील. काळानं सूड घ्यायला सुरुवात केली आहे. सत्य हे ‘कडू’च असते. त्याला कोण काय करणार?, अशी खोचक टिप्पणीही 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
Bacchu Kadu: सरकार बनवतोय, मदत पाहिजे, माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले; फडणवीसांनी गुपित फोडलं

राणा-कडूंचा वाद पुन्हा पेटणार


अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यातील वादावर पडदा पडल्याची चर्चा सुरू असतानाच या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. बच्चू कडू यांनी समर्थकांचा मेळावा घेत पुन्हा वैयक्तिक आरोप केल्यास कोथळा बाहेर काढू, असा इशारा दिल्यानंतर रवी राणांनीही आक्रमक वक्तव्य केलं. बच्चू कडू पुन्हा आमदार कसा होणार ते पाहा, असं आव्हान राणा यांनी दिल्यानंतर हा वाद पुन्हा चिघळला आहे. मात्र, मला आता हा वाद वाढवायचा नाही. कारण या वादात शेतकरी आणि दिव्यांगांचे प्रश्न मागे पडत आहेत. आता आपण यामध्ये अडकून पडलो तर हे प्रश्न मागे राहतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे.
रोहित धामणस्कर यांच्याविषयी
रोहित धामणस्कर
रोहित धामणस्कर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | लोकसत्ता, झी २४ तास, टीव्ही ९ मराठीसह डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ९ वर्षांचा अनुभव | सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... Read More

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज