अ‍ॅपशहर

आर्थिक मंदीमुळं वर्गणी घटली; छोटी मंडळे आर्थिक विवंचनेत!

दहीहंडीपाठोपाठ गणेशोत्सवालाही आर्थिक मंदीचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. नामांकित मंडळांचा अपवाद वगळता अनेक छोट्या मंडळांना वर्गणी मिळवतानाही कष्ट घ्यावे लागत आहेत. आर्थिक मंदीमुळे अनेक प्रायोजकांनी घेतलेली माघार, पालिकेच्या जाहिरातीसंबंधित धोरणामुळे आलेली बंधने आणि एकाच विभागात अनेक मंडळांच्या भाऊगर्दीमुळे ही परिस्थिती ओढवल्याचे मंडळांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र टाइम्स 28 Aug 2019, 3:20 pm
मुंबई: दहीहंडीपाठोपाठ गणेशोत्सवालाही आर्थिक मंदीचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. नामांकित मंडळांचा अपवाद वगळता अनेक छोट्या मंडळांना वर्गणी मिळवतानाही कष्ट घ्यावे लागत आहेत. आर्थिक मंदीमुळे अनेक प्रायोजकांनी घेतलेली माघार, पालिकेच्या जाहिरातीसंबंधित धोरणामुळे आलेली बंधने आणि एकाच विभागात अनेक मंडळांच्या भाऊगर्दीमुळे ही परिस्थिती ओढवल्याचे मंडळांचे म्हणणे आहे. या आर्थिक विवंचनेमुळे अनेक छोट्या मंडळांनी आपल्या कार्यकर्त्यांना खिशातून अतिरिक्त वर्गणी गोळा करण्यास सांगितले असून या पैशांतून आता उत्सवाची जबाबदारी पार पाडणार असल्याचे कळते. ही परिस्थिती कायम राहिल्यास सार्वजनिक गणेशोत्सवात छोटी मंडळे टिकतील काय, असा सवाल आता ही छोटी मंडळे विचारू लागली आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम small ganesh mandals facing financial crunch due to economic slowdown
आर्थिक मंदीमुळं वर्गणी घटली; छोटी मंडळे आर्थिक विवंचनेत!


सध्या मुंबईभरात १२ हजारांहून अधिक सार्वजनिक मंडळे आहेत. अनेक ठिकाणी एकाच विभागात एकाहून अधिक मंडळे उत्सव साजरा करत आहेत. त्यामुळे विभागातील उद्योजक, दुकानदार, नागरिकांना प्रत्येक मंडळांला वर्गणी देणे कठीण जात आहे. तीन वर्षांपूर्वी झालेली नोटबंदी आणि अलीकडे आलेली आर्थिक मंदी यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये 'खणखणाट' दिसतो आहे. पालिकेच्या जाहिरातीसंबंधित धोरणातील बंधनांमुळे स्थानिक उद्योजकांनी जाहिरात देणे टाळल्याने त्यातून मिळणारे उत्पन्नही घटले आहे. त्यामुळे वर्गणीव्यतिरिक्त निधी उभारणीचे सर्वच स्रोतच छोट्या मंडळांसाठी बंद झाले आहेत. वर्गणी गोळा करण्यावरही देखील मर्यादा असल्याने मंडळांकडे वर्गणी जमा न झाल्यास उत्सव कसा साजरा करायचा असा प्रश्न मंडळांना पडला आहे. नव्या मंडळांची बेसुमार वाढ होत गेली तर आम्हा जुन्या छोट्या मंडळांनीही उत्सवातून गाशा गुंडाळावा लागेल, अशी एका मंडळाच्या पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली.

आम्ही अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत असून रहिवाशांनी दिलेल्या वर्गणीतून हा सोहळा पार पडत असतो. यंदाचे वर्गणीबाबतचे चित्र थोडे थंड आहे. खर्च लक्षात घेता आम्ही कार्यकर्ते मिळून अतिरिक्त निधी जमा करणार आहोत. उत्सवात खंड पडू देणार नाही, अशी प्रतिक्रिया कांजूरमार्गच्या शिवशक्ती गणेशोत्सव मंडळाच्या संदीप सारंग यांनी व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज