अ‍ॅपशहर

स्मार्ट स्पीकर्स बनणार ‘मुंबईचे वाटाडे’

आपल्या मनात काही प्रश्न असले तर त्यांचे उत्तर शोधण्यासाठी सध्या आपण 'गुगल'चा वापर करतो. पण, सर्वांनाच 'गुगल' वापरणे शक्य होत नाही. 'गुगल'वर अचूक उत्तर शोधणेही कधीकधी शक्य नसते. अशावेळी मुंबईकरांना तसेच मुंबईत येणाऱ्या नवीन लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आता 'स्मार्ट स्पीकर्स' बसविले जाणार आहेत.

Maharashtra Times 28 Jun 2018, 7:04 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम smart-speakers


आपल्या मनात काही प्रश्न असले तर त्यांचे उत्तर शोधण्यासाठी सध्या आपण 'गुगल'चा वापर करतो. पण, सर्वांनाच 'गुगल' वापरणे शक्य होत नाही. 'गुगल'वर अचूक उत्तर शोधणेही कधीकधी शक्य नसते. अशावेळी मुंबईकरांना तसेच मुंबईत येणाऱ्या नवीन लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आता 'स्मार्ट स्पीकर्स' बसविले जाणार आहेत. आयआयटी मुंबईतील 'इंडस्ट्रीअल डिझाइन सेंटर'चे (आयडीसी) प्रा. अनिरुद्ध जोशी यांनी ब्रिटनमधील स्वानसी विद्यापीठ यांच्या सहकार्याने हा प्रयोग साकारला आहे.

अमूक एका ठिकाणी जाण्यासाठी कोणती बस आहे? आज पाऊस पडेल का? इथपासून ते अगदी जगण्याला काय अर्थ आहे इथपर्यंतच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा स्मार्ट स्पीकर देणार आहे. 'गुगल होम' किंवा 'अॅमेझॉन अॅलेक्सा' या व्हॉईस मॅपिंग तंत्रज्ञानाची ही पुढची आवृत्ती आहे. याला 'मुंबईची अॅलेक्सा' अशीही ओळख मिळत आहे. हा स्पीकर एका दुकानात ठेवलेला असेल. तेथे असलेले एक बटण दाबून तुम्ही त्यावरील माइकच्या आधारे तुमचा प्रश्न विचारू शकता. हा प्रश्न विचारला की तुम्ही तुमचा नंबर समोरच्या कागदावर लिहायचा. यानंतर १० मिनिटांनी तुम्ही या उपकरणावरील डायलपॅडच्या मदतीने तो क्रमांक डायल केला की तेथील स्पीकरवर तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले जाईल. याचा प्रयोग यशस्वी झाला असून लवकरच धारावीसारख्या परिसरात ही उपकरणे बसवण्यात येणार आहेत. भविष्यात या उपकरणाच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांना केवळ रोबो नव्हे तर आसपासची माणसेही उत्तरे देऊ शकतील अशी व्यवस्थाही करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रा. जोशी यांनी 'मटा'ला सांगितले. हे तंत्रज्ञान ब्रिटन येथील स्वानसी विद्यापीठाच्या सहकार्याने आयडीसीमधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी पूर्ण केले आहे.

या प्रयोगात काम करत असताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्यावर आमचा तंत्रज्ञान विकासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे जाणवले. ही माहिती केवळ भारतातील नव्हे तर जगभरात नवीन तंत्रज्ञान विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.

- प्रा. मॅट जॉन्स, स्वानसी विद्यापीठ, ब्रिटन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज