म. टा. प्रतिनिधी, मुंबई
दादर पूर्वेला राहणाऱ्या शेअर ब्रोकरने शुक्रवारी सकाळी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. हिरेन दंड (५६) असे या ब्रोकरचे नाव असून, याप्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दादर पूर्वेकडील ग. द. आंबेकर मार्गावर असलेल्या स्प्रिंग टॉवरमध्ये हिरेन आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हिरेन यांनी २२व्या मजल्यावरून उडी मारली. घटनास्थळी चिट्ठी अथवा अन्य काहीच न सापडल्याने त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. हिरेन गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. त्यातूनच हे पाऊल उचलण्यात आल्याचे म्हटले जात आहे.