अ‍ॅपशहर

शिक्षणासाठी विद्यार्थी घालताहेत जीव धोक्यात, बेस्ट बंद असल्याने रेल्वे रुळांवरुन प्रवासाची वेळ

Mumbai News: शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना रेल्वे रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या भागातील बससेवा पूर्ववत करण्याची मागणी पालक, विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

Authored byनितीन चव्हाण | Edited byकिशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Dec 2023, 12:12 pm
मुंबई : शिवडी-वरळी व शिवडी-न्हावाशेवा उन्नत मार्गांचे काम सध्या सुरू आहे. यासाठी साहित्य वाहतूक करणाऱ्या गाड्यांची वर्दळ असते. त्यामुळे या भागातील पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली बेस्ट बस चार महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. ही बससेवा पूर्ववत करण्याची मागणी पालक, विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम school track cross
शिक्षणासाठी विद्यार्थी घालताहेत जीव धोक्यात, बेस्ट बंद असल्याने रेल्वे रुळांवरुन प्रवासाची वेळ


शिवडी, कॉटनग्रीन प्रभाग क्रमांक २०६ हा विभाग पूर्व-पश्चिम असा विभागला आहे. या भागात प्रबोधनकार ठाकरे शाळा, तसेच शिवडी-कोळीवाडा व अभ्युदयनगर या पालिकेच्या शाळांमध्ये शिवडी पूर्वेकडून विद्यार्थी येतात. त्यांना पूर्व मुक्त मार्गाखालून अवजड वाहनांमधून मार्ग काढत शिवडी-कोळीवाडा, तसेच फाटक ओलांडून प्रबोधनकार ठाकरे शाळेत पश्चिमेकडे जावे लागते. विद्यार्थ्यांची ही गरज लक्षात घेऊन सन २०१८मध्ये विभागातील बेस्ट बससेवा सुरू करण्यात आली होती. कोणतेही कारण न देता यंदाच्या ऑगस्टपासून ही सेवा खंडित करण्यात आली. यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी सप्टेंबरमध्ये पत्रव्यवहार केल्यानंतर शिक्षण विभागाने ही सेवा थोड्या दिवसांत चालू होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र चार महिने उलटूनही ही बस सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे मंगळवारी पक्षाकडून पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी व राजेश कंकाळ यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

शिवडी विभाग हा प्रचंड रहदारीचा असून, याठिकाणी शिवडी-वरळी, शिवडी-न्हावाशेवा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे मोठे मोठे ट्रेलर्स, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ सुरू असते. त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्टचा विभाग असल्याने कोणती सिग्नल यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित नाही. इथे भारत पेट्रोलियम व इतर पेट्रोलियम कंपन्यांचे कारखाने असल्यामुळे त्यांच्या टँकरची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. या वाहतुकीतून वाट काढत मुलांना रेल्वे रूळ ओलांडून पलीकडे शाळेत जावे लागते. त्यांच्यासाठी बेस्ट बससेवा अत्यावश्यक आहे, असे पडवळ म्हणाले.
मालगाड्यांच्या घसरगुंडीचा मनस्ताप; मध्य रेल्वेकडून अपघाताची कारण शोधण्यासाठी चौकशी सुरु
... तर विद्यार्थ्यांसोबत आंदोलन

मागील काही दिवसांत शिवडी-कोळीवाडा येथे एका विद्यार्थिनीचा अपघात झाला असून, तिला दुखापत झाली आहे. पालिकेने अधिक अपघातांची वाट न पाहता बेस्टकडून बससेवा पूर्ववत करून घ्यावी. आधी केलेल्या मागणीची गांभीर्याने दखल न घेतल्याने अपघाताचे प्रकार घडत आहेत. येत्या आठवडाभरात बससेवा पूर्ववत न झाल्यास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

महत्वाचे लेख