अ‍ॅपशहर

जातप्रमाणपत्रासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने राज्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठी २३४४ विद्यार्थी जातप्रमाणपत्र ऑनलाइन सादर करू शकले नाहीत.

Maharashtra Times 13 Aug 2018, 6:07 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम engineering


मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने राज्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठी २३४४ विद्यार्थी जातप्रमाणपत्र ऑनलाइन सादर करू शकले नाहीत. जातप्रमाणपत्र ऑनलाइन देण्याची मुदतही १० ऑगस्टला संपली होती. मात्र अखेरच्या क्षणी तंत्रशिक्षण संचालकांकडून प्रवेश नियामक प्राधिकरणाकडे परवानगी मागण्यात आली व प्राधिकरणानेही आता १४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांच्या जातपडताळणी तसेच प्रवेशासाठी मुदत वाढवून दिली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन केले जात आहे. तसेच धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. काही भागांत या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे पोलिसांनी इंटरनेट सेवा बंद केली होती. मात्र याच काळात सीईटीमार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. महाराष्ट्र सीईटीची मे महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. ७ ऑगस्टपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र त्याच दरम्यान मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने झाली. अनेक भागांत बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थी जात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करू शकले नाहीत. जात प्रमाणपत्र ऑनलाइन देण्याची मुदत १० ऑगस्ट होती. त्यामुळे २३४४ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा पेच निर्माण झाला होता.

तातडीने हालचाल

सीईटीमार्फत प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत केली जाते. १० ऑगस्टची मुदत संपल्यामुळे २३४४ विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्राचा प्रश्न निर्माण झाला होता. जातप्रमाणपत्राची मुदत संपल्यामुळे त्यांचा प्रवेश होऊ शकला नसता. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने तातडीने प्रवेश नियामक प्राधिकरणाकडे मुदतवाढ देण्याची विनंती केली. त्यानुसार या प्रवेशासाठी तसेच जातप्रमाणपत्र ऑनलाइन देण्याची मुदत १४ ऑगस्टपर्यंत वाढवून देण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज