अ‍ॅपशहर

इंजिनीअर व्हायचं स्वप्न पूर्ण झालं!

दहावीच्या परीक्षेनंतर इंजिनीअरिंगचे स्वप्न उराशी होते खरे, पण मोखाड्यातील छोट्याशा गावात राहणाऱ्या अविनाश वडच्या घरची परिस्थिती बेताची होती. या परिस्थितीमध्ये मार्ग दिसत नव्हता. ‘त्यावेळी ‘मटा हेल्पलाइन’च्या माध्यमातून मदतीचा हात मिळाला आणि सामान्य वाचकांनी केलेल्या मदतीतून माझं शिक्षण झालं,’ असं अविनाश प्रांजळपणे कबूल करतो.

Maharashtra Times 7 Aug 2017, 3:35 am
अविनाश वडला मिळाला ‘मटा हेल्पलाइन’चा आधार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम success story of avinash wad
इंजिनीअर व्हायचं स्वप्न पूर्ण झालं!


म. टा. वृत्तसेवा, डोंबिवली

दहावीच्या परीक्षेनंतर इंजिनीअरिंगचे स्वप्न उराशी होते खरे, पण मोखाड्यातील छोट्याशा गावात राहणाऱ्या अविनाश वडच्या घरची परिस्थिती बेताची होती. या परिस्थितीमध्ये मार्ग दिसत नव्हता. ‘त्यावेळी ‘मटा हेल्पलाइन’च्या माध्यमातून मदतीचा हात मिळाला आणि सामान्य वाचकांनी केलेल्या मदतीतून माझं शिक्षण झालं,’ असं अविनाश प्रांजळपणे कबूल करतो.

लहानपणापासूनच अविनाशने इंजिनीअर व्हायचे स्वप्न मनामध्ये ठेवले होते. मात्र, इंजिनीअरिंग कॉलेजची फी आणि अन्य शैक्षणिक खर्च अविनाशच्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा होता. त्यामुळे हे स्वप्न भंगणार अशी भीतीही त्याला वाटली होती. मात्र, त्यावेळी ‘मटा’च्या हेल्पलाइनने आपल्याला आधार दिल्याचे अविनाश सांगतो.

हेल्पलाइनच्या माध्यमातून अविनाशच्या स्वप्नांना नवीन उभारी मिळाली. प्रचंड मेहनत करून मुंबईतील ‘व्हीजेटीआय’सारख्या प्रख्यात कॉलेजमधून त्याने चांगल्या गुणांनी इंजिनीअरिंग पूर्ण केलं.

लोकांनी केलेल्या मदतीमुळेच चांगल्या कॉलेजात शिकण्याची संधी मला मिळाली. लोकांनी शिक्षणासाठी दिलेला पैसा संपूर्णपणे केवळ माझ्या शिक्षणासाठीच वापरला, या मदतीचे मोल मोठे असल्याचे अविनाश सांगतो. या मदतीबरोबरच एक जबाबदारी लोकांनी माझ्यावर दिली होती आणि आज इंजिनीअर झाल्यानंतर ती जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केल्याचे समाधान अविनाशला वाटत आहे. सध्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी तो करत असून चांगला प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न त्याने आता उराशी बाळगले आहे.

मला लोकांनी मदत केली त्याचप्रमाणे यंदा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणी विद्यार्थ्यांनासुद्धा मदतीची गरज आहे. त्यामुळे त्यांनाही मदत मिळाली पाहिजे, असे तो आवर्जून सांगतो. महाराष्ट्रामध्ये गुणवंत विद्यार्थी खूप आहेत. यातील अनेकांची स्वप्नं अपेक्षित मदत न मिळाल्याने अपूर्ण राहतात. आपल्या राष्ट्राचे उद्याचे भविष्य असणाऱ्या या विद्यार्थ्यांना सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन त्याने वाचकांना केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज