अ‍ॅपशहर

वसईतल्या 'त्या' कुटुंबाचे सुषमांकडून सांत्वन

जमैका येथे नुकताच आपला मुलगा गमावलेल्या वसईतल्या एका कुटुंबाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज सकाळी टि्वट करून सांत्वन केले आणि या कुटुंबाला मदतीचे आश्वासनही दिले.

Maharashtra Times 11 Feb 2017, 10:49 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sushma swaraj assures help to family of vasai youth shot by robbers in jamaica
वसईतल्या 'त्या' कुटुंबाचे सुषमांकडून सांत्वन


जमैका येथे नुकताच आपला मुलगा गमावलेल्या वसईतल्या एका कुटुंबाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज सकाळी टि्वट करून सांत्वन केले आणि या कुटुंबाला मदतीचे आश्वासनही दिले.

राकेश तलरेजा (२५) याची गुरुवारी जमैकातील किंग्स्टन येथे चार अज्ञात इसमांनी गोळ्या घालून हत्या केली. राकेश किंग्स्टनमधील कॅरिबेन ज्वेलर्समध्ये सेल्सपर्सन म्हणून काम करत होता. शुक्रवारी सकाळी वसईत राहणाऱ्या राकेशच्या पालकांना त्याच्या मालकाचा फोन आला. गुरुवारी जमैकाच्या वेळेनुसार सायंकाळी ७.१० वाजता राकेशची त्याच्या राहत्या घरी हत्या करण्यात आल्याची बातमी त्याच्या मालकाने दिली. राकेशचे आईवडिल वसई पश्चिमेला अंबाडी रोडवर राहतात.

'जमैकातील कार्यवाही पूर्ण करून राकेशचा मृतदेह भारतात आणण्याकामी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन स्वराज यांनी आम्हाला दिले आहे,' असे राकेशची चुलत बहिण पूनम आहुजा हिने सांगितले.

पोलिसांना राकेशच्या मारेकऱ्यांचा अद्याप सुगावा लागलेला नाही. राकेश जमैकातल्या चेरी गार्डन्स, किंग्स्टन ८, या पत्त्यावरील घरी आणखी दोन भारतीयांसोबत राहत होता. दरोड्याच्या उद्देशाने हे चार जण घरात घुसले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. हे अज्ञात घरात घुसले तेव्हा राकेश त्याच्या पहिल्या मजल्यावरील बेडरुममध्ये होता. त्या चौघांनी राकेशच्या रुममेट्सकडून पैसे, मोबाईल हिसकावून घेतले. राकेशचाही फोन हिसकावला. जाताना राकेशच्या पाठीत ३ गोळ्या घातल्या. त्याला किंग्स्टन पब्लिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण तत्पूर्वीच तो मृत पावला होता. त्याच्या रुममेट्सच्या पायांवर गोळ्या लागल्या आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राकेशच्या कुटुंबाला त्याच्याबाबतीत नेमके काय घडले त्याची कोणतीच माहिती मिळत नसल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने केले होते. त्यानंतर स्वराज यांनी टि्वट करून या कुटुंबाचे सांत्वन केले आणि मदतीचे आश्वासन दिले. राकेशच्या मित्रांशी संपर्क साधून त्यांच्या उपचारांसाठीही मदत करण्याचे आदेश स्वराज यांनी जमैकातील भारतीय दूतावासाला दिले होते. तेथील भारतीय उच्चायुक्तांनी पोलीसांशी संपर्क साधून तपशील घेतला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज