अ‍ॅपशहर

जागो ग्राहक जागो...

ग्राहकांनी त्यांच्या हक्कांसाठी पुढे यायला हवे, तक्रारी नोंदवायला हव्यात, असे आवाहन वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी १५ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त केले आहे.

Maharashtra Times 14 Mar 2017, 4:15 am
दुहेरी एमआरपी असो वा इंधनामध्ये मापात पाप करण्याची वृत्ती. वैध मापन विभागाने या वर्षी ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून महत्त्वाच्या धडक मोहिमा राबवल्या. ग्राहकांनी त्यांच्या हक्कांसाठी पुढे यायला हवे, तक्रारी नोंदवायला हव्यात, असे आवाहन वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी १५ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम talktime with amitabh gupta
जागो ग्राहक जागो...


वैधमापन शास्त्र विभागाने ग्राहककेंद्री मोहिमांवर आता अधिक भर द्यायला सुरुवात केली आहे, त्यामागील तुमची भूमिका काय आहे?

ग्राहकांकडून आम्हाला वेगवेगळ्या तक्रारी येत असतात. त्या सगळ्याच तक्रारींमध्ये तथ्य असतेच असे नाही. पण ते आम्हाला त्यांना उत्पादनांच्या, बाजारांमधील तक्रारी वा खटकणाऱ्या गोष्टी ग्राहक कळवत असतात. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुद्दा केवळ ‘मापात पाप’ करणाऱ्या तक्रारींचाच नसतो तर आता बदलत्या बाजारपेठांच्या निकषांप्रमाणे ग्राहकाला फसवण्याचेही अनेक प्रकार उदयाला आले आहेत. या सगळ्या तक्रारींचा व्यवस्थित अभ्यास करून आम्ही त्यांना चाळणी लावतो. बाजाराचा ट्रेन्ड लक्षात घेतो, एकाच प्रकारची फसवणूक जर वेगवगेळ्या दहा ग्राहकांची होत असेल तर त्यात तातडीने लक्ष द्यायलाच हवे, हे आम्ही पक्के ठरवले आहे. त्यामुळे हा दृष्टीकोन अधिकाधिक ग्राहकाभिमुख व्हावा, यादृष्टीने आम्ही धडक मोहिमा राबवत आहोत.

कोणत्या प्रकारच्या तक्रारी तुमच्याकडे येतात?

वजनकाटा योग्य नाही, वजन करताना त्यात शिताफीने घोळ घातला जातो, दूधाच्या दरामध्ये समानता नसते, कुलिंगचे अतिरिक्त दर घेतले जातात, अशा तक्रारींपासून मोठ्या उत्पादनांच्या किंमती, हॉटेल्समध्ये सेवाशुल्क द्यावे का, अशा अनेक प्रकरणांमध्ये ग्राहकांच्या मनात प्रश्न असतात. या विविध प्रकरणांमध्ये त्यांची अनेकदा लूटही होत असते. ती थांबावी, यासाठी ग्राहक आम्हाला संपर्क साधतात.

तुम्ही कारवाई केली की, काही दिवस संबधित उत्पादक ग्राहकांची लूट थांबवतात, 'पुन्हा ये रे माझ्या मागल्या'चा प्रकार दिसतो, याला चाप कसा लावणार ?

यात काही प्रमाणात तथ्य आहे. म्हणूनच ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या उत्पादन वा सेवांना सुधारण्यासाठी त्यांच्याशी संबधित यंत्रणेतील प्रत्येक जबाबदार घटकाला या मोहिमांशी आम्ही जोडून घेत आहोत. शहर, राज्य व केंद्र असा भेद न ठेवता ग्राहककेंद्री विचार ठेवून सर्वच स्तरावरील ग्राहकांच्या हितासाठी निर्णय होतील यादृष्टीनेच प्रयत्न सुरू आहे. स्टेन्टच्या किंमती असोत वा पेट्रोल पंपावरील इंधन कमी देण्याच्या. या सर्व प्रकरणांमध्ये व्यवस्थित अभ्यास करून अहवाल तयार करतो. या संदर्भात निर्णय घेणाऱ्या प्रमुख केंद्रांना तो कळवतो. ग्राहकांची फसवणूक टळावी, चुकीच्या पद्धतींच्या गोष्टींना चाप लागावा यासाठी आम्ही अभ्यासपूर्ण मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

वैधमापन शास्त्र विभागापुढील अडचणी कोणत्या आहेत?

मनुष्यबळाची कमतरता ही आमच्यापुढील सर्वांत मोठी अडचण आहे. त्यामुळे अनेक बाबतीत नियोजन करूनही आम्हाला धडक कृती करता येत नाही. यासंदर्भात सरकारकडे आम्ही प्रस्ताव पाठवला आहे, लवकरच यासंदर्भातील निर्णय होईल, अशी आशा आहे.

तुम्ही ग्राहककेंद्री मोहिमांमध्ये मुंबई ग्राहक पंचायतीलाही सोबत घेऊन काम केले, त्यामागील नेमका उद्देश काय होता?

मुंबई ग्राहक पंचायत आणि वैधमापन शास्त्र विभागाचा उद्देश ग्राहकांचे ह‌ित हाच आहे. त्यांच्याकडे स्वयंसेवक आहेत, तर आमच्याकडे कायदेशीर अधिकार. त्यामुळे मनुष्यबळाची अडचण सोडवून एकाच ध्येयासाठी काम करणे केव्हाही चांगलंच. तेच आम्ही केले.

जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहकांना काय सांगाल ?

'जागो ग्राहक जागो', हेच पुन्हा एकदा सांगेन. प्रत्येक गोष्टीला ग्राहक म्हणून स्वतःचेही निकष लावा. बाजारपेठांना तुम्हाला गृहित धरू देऊ नका. एखादे उत्पादन, सेवा यासंदर्भात लूट होत असेल, फसवणूक होत असेल, असे वाटत असेल तर तातडीने वैधमापन विभागाला फोन, मेलद्वारे कळवा. तुमच्या तक्रारींची शहानिशा करून या प्रकरणांत आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. कोणत्याही हॉटेलमध्ये एसी आहे म्हणून अधिक किंमत आकारली जाणारच, यासारख्या अनेक भ्रामक कल्पनांमध्ये राहून लूट होऊ देऊ नका. ग्राहक म्हणून उत्पादनाचा दर्जा, गुणवत्ता, किंमत यासंदर्भात प्रश्न पडले, तर पुढाकार घ्या, धैर्याने प्रश्न विचारा. न्याय नक्की मिळेल!

(मुलाखत - शर्मिला कलगुटकर)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज