अ‍ॅपशहर

महिला सक्षमीकरणासाठी ‘चाय का ठेला’

ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी आजही विद्यार्थ्यांना कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास आणि गृहिणींनी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेता विद्यार्थी आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आयआयटीच्या काही विद्यार्थ्यांनी सौरदिवे आणि इंडक्शन कूकर निर्मितीचे प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. त्याची माहिती देणारा 'सोलार चाय ठेला' यंदा आयआयटी मुंबईच्या भव्य प्रांगणात सुरू असलेल्या 'टेकफेस्ट १८'मध्ये दिसून आला.

Maharashtra Times 15 Dec 2018, 4:45 am
प्रथमेश राणे, कॉलेज क्लब रिपोर्टर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tea trash for women empowerment
महिला सक्षमीकरणासाठी ‘चाय का ठेला’


मुंबई: ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी आजही विद्यार्थ्यांना कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास आणि गृहिणींनी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेता विद्यार्थी आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आयआयटीच्या काही विद्यार्थ्यांनी सौरदिवे आणि इंडक्शन कूकर निर्मितीचे प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. त्याची माहिती देणारा 'सोलार चाय ठेला' यंदा आयआयटी मुंबईच्या भव्य प्रांगणात सुरू असलेल्या 'टेकफेस्ट १८'मध्ये दिसून आला.

प्राध्यापक चेतन सोलंकी आणि जयंद्रन वेंकटेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प सुरू केला आहे. या 'सोलार चाय ठेला'चा प्रमुख हर्षद सुपल याने त्याविषयी माहिती दिली. 'ग्रामीण भागातील बचतगटांना पाच दिवसांचे प्रशिक्षण देऊन सौरदिव्यांची निर्मिती, व्यवस्थापन आणि अंतिम उत्पादनाचे वितरण कसे करावे हे शिकवले जाते. सोबत दुरुस्ती-देखभालीचेही प्रशिक्षण दिले जाते. आठ महिन्यांनंतर यातील निवडक महिलांना उद्योजिका बनण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या महिला टॉर्च, पंखा, कंदिल अशा विविध गोष्टींचे उत्पादन स्वतः करू शकणार आहेत', असे हर्षदने 'मटा'ला सांगितले.

या प्रकल्पासाठी हर्षदसह प्रसाद सावंत, रघुवेंद्र नारायण, पवन वेंकटा, सतीश, विनय प्रतापसिंग, राकेश अहिरे या ७ जणांची टेक्निकल टीम काम करत असून त्यांना ऑपरेशन टीम, इंटरप्राईज टीम, ट्रेनिंग टीम, फायनान्स टीम अशा इतर टीम्स मदत करत आहेत. या प्रकल्पासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी www.ggsy.in या वेबसाइटवर भेट देण्याची विनंती करण्यात आली आहे.

प्रकल्पाचा प्रवास

सन २०१४ पासून आयआयटीच्या 'सोल्स' म्हणजेच, 'सोलार पॉवर थ्रू लोकलायजेशन फॉर सस्टेनेबिलिटी'तर्फे प्रकल्पावर काम सुरू झाले असून यंदाच्या वर्षी या प्रकल्पातून उद्योजिका निर्माण करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. आतापर्यंत या प्रकल्पांतर्गत २५ दुकाने तयार झाली आहेत. किमान ७०० दुकाने निर्माण व्हावी हे टीमचे लक्ष्य आहे. सध्या हा प्रकल्प उत्तर प्रदेश, ओडिशा, आसाम, झारखंड आणि बिहार या पाच राज्यांमध्ये सुरू आहे.

'फ्री चाय'ची कल्पना

सौरऊर्जेच्या मदतीने तुम्ही पूर्ण स्वयंपाक बनवू शकता याबद्दल जनजागृती करण्यासाठी 'टेकफेस्ट'च्या निमित्ताने आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये चहाची हातगाडी लावण्यात आली आहे. या चहासाठी पैसे आकारले जात नसून प्रकल्पाची पूर्ण माहिती या चहाच्या हातगाडीवर देण्यात येते. सौरऊर्जेवर चालणाऱ्या अशा पन्नास हातगाड्या मुंबईतही सुरू व्हाव्यात यासाठी प्रयत्न आहे.

पुष्पा भोईर पहिल्या मानकरी

आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये असलेला हा ठेला 'टेकफेस्ट'नंतरही कायम राहणार असून, पवई येथील पुष्पा भोईर मुंबईतील

पहिल्या 'सोलार चहा ठेल्या'च्या मानकरी ठरल्या आहेत. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून त्या हा ठेला सांभाळणार आहेत.

(फोटो: प्रथमेश राणे)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज