म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात बुधवारी घडली. नर्गिस कांगा (६५) असे तिचे नाव असून, ती एकटीच राहत होती.
ग्रॅण्ट रोड स्थानकानजीक ऑगस्ट क्रांती मार्गावर असलेल्या 'निर्मल निवास' इमारतीत तिसऱ्या मजल्यावर हा फ्लॅट असून, पहाटे चारच्या सुमारास त्यामध्ये आग लागली. रहिवाशांनी तत्काळ याबाबतची माहिती पोलिस आणि अग्निशमन दलाला दिल्यानंतर चार बंब घटनास्थळी दाखल झाले. पाच तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले, तर नर्गिस ९० टक्के भाजल्या. नायर रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिस त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. आगीचे नेमके कारण समजले नसले तरी ती शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.