अ‍ॅपशहर

प्रवेशद्वारे खुली करा! मध्य- पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची मागणी

मध्य आणि पश्चिम रेल्वेची रोजची एकूण प्रवासीसंख्या ६० लाखांहून अधिक झाली असल्याने रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारांवर मोठी गर्दी उसळत आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 21 Oct 2021, 10:20 am
मध्य-पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai-local-news


- स्थानकांतील अनेक प्रवेशद्वारे बंदच

- प्रवासीसंख्या ६० लाखांवर पोहाचली

म. टा. प्रतिनिधी मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेची रोजची एकूण प्रवासीसंख्या ६० लाखांहून अधिक झाली असल्याने रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारांवर मोठी गर्दी उसळत आहे. रेल्वे प्रशासनाकडून गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. यामुळे संतप्त प्रवाशांकडून, 'आता तरी स्थानकांवरील सर्व दारे खुली करा', अशी मागणी करण्यात येत आहे.

करोना काळात रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारे मर्यादित स्वरूपात खुली ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला होता. सध्या सर्व व्यवहार सुरळीत होत असताना करोना काळात बंद केलेले स्थानकांचे अनेक दरवाजे अद्यापही 'जैसे थे'च असल्याने स्थानकांत येताना आणि बाहेर पडताना प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, बोरिवली या रेल्वे स्थानकातील काही प्रवेशद्वारांवर लोखंडी पत्रे आणि बांबू लावण्यात आले आहेत. रेल्वे प्रवाशांनी याबाबत तक्रार केल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून काही प्रवेशद्वारावरील पत्रे हटवण्यात आले. मात्र सीएसएमटीतील टाइम्स ऑफ इंडिया कार्यालयाकडे उघडणारे प्रवेशद्वार, बोरिवली स्थानकातील पादचारी पूलाला जोडणारा भाग आणि अन्य रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वार बंद असल्याने नागरिकांना वळसा घालून स्थानकात प्रवेश करावा लागत आहेत.

सध्या मध्य रेल्वेवर ३३ लाख प्रवासी आणि पश्चिम रेल्वेवर २८ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. करोना पूर्व काळातील ८० लाखांपैकी ६१ लाख प्रवासी पुन्हा रुळांवर परतले आहेत. मात्र त्या तुलनेत लोकल फेऱ्या पूर्ववत झालेल्या नाहीत. तिकीट व्यवस्थादेखील पूर्णपणे सुरू झालेली नाही. राज्य सरकारकडून निर्बंध खुले करत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, याची दखल घेत रेल्वे प्रशासनाकडून प्रत्यक्ष कृती करण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षावर रेल्वे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज