अ‍ॅपशहर

मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक जलद व सुखद होण्याची चिन्हे; पश्चिम रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Mumbai Local Train: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी जलद होणार आहे. प्रवाशांना आता खार ते बोरिवली अशी सहावी मार्गिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे

Authored byमहेश चेमटे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2023, 11:00 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः पश्चिम रेल्वेवरील ‘मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गिके’च्या तब्बल १४ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना आता खार ते बोरिवली अशी सहावी मार्गिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मुंबई सेंट्रल आणि खारमधील अडथळ्यांमुळे हा मार्ग तूर्त ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai local


मुंबई सेंट्रल ते खारदरम्यान अतिरिक्त मार्गिका उभारण्यासाठी सात यार्डांमध्ये तांत्रिक बदल करावे लागणार आहेत. त्याचबरोबर हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीचा पूल अडथळा ठरत आहे. हा पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे. यामुळे हार्बर आणि पश्चिम रेल्वे वाहतूक अधिक कालावधीसाठी विस्कळीत होण्याची भीती आहे. यामुळे खार ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचा आराखडा मंजूर करून त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. खार ते बोरिवली दरम्यान रेल्वे रुळांलगत मोठ्या संख्येने अतिक्रमणे आहेत. सर्वेक्षणाअंती अधिकृत ६०७ प्रकल्पबाधित निश्चित करण्यात आले असून, त्यांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमाने पर्यायी घरे देण्यात आली आहेत. यापैकी २६० कुटुंबीय पर्यायी घरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. उर्वरित प्रकल्पबाधितांना घरांचे वाटप करण्यात आले आहे.

खार ते गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम ८० टक्के झाले असून, जूनअखेर हे काम पूर्ण होईल. गोरेगाव ते बोरिवलीचे काम वेगाने सुरू आहे. मार्च, २०२४पर्यंत खार ते बोरिवली हा संपूर्ण सहावा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

प्रकल्प : एमयूटीपी २

प्रकल्पाचे नाव : मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावी मार्गिका (३० किमी)

अपेक्षित मंजूर खर्च : ९१८.५३ कोटी रु.

सध्या झालेला खर्च : ५१५ कोटी रु.

प्रकल्पाची सद्यस्थिती

खार ते गोरेगाव पहिला टप्पा (८.७३ किमी)

- ८० टक्के काम पूर्ण ; पहिला टप्पा कालमर्यादा : जून, २०२३

गोरेगाव ते बोरिवली दुसरा टप्पा (८.१५ किमी)

- ५० टक्के काम पूर्ण ; दुसरा टप्पा कालमर्यादा : मार्च, २०२४

प्रकल्पाचा फायदा


सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या चालवण्यासाठी अतिरिक्त मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे सध्याच्या लोकल फेऱ्यांच्या एकूण क्षमतेत २५ टक्के फेऱ्या वाढवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

पाचवा मार्ग अंतिम टप्प्यात


मुंबई सेंट्रल ते बोरिवली पाचव्या मार्गिकेमध्ये माहीम ते खार वगळता उर्वरीत मार्ग तयार आहे. माहीम ते खार दरम्यान जागेच्या अनुपलब्धतेमुळे काम रखडले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, संपादन पूर्ण झाल्यावर प्राधान्याने हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख