अ‍ॅपशहर

आयोडिनयुक्त मिठाच्या अतिवापरामुळे थायरॉइड

सर्वसामान्यांमध्ये थायरॉइड होण्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे. बदलत्या जीवनशैलीसह जेवणात असणारे आयोडिनयुक्त मीठ त्यासाठी कारणीभूत असल्याचे महत्त्वाचे संशोधन डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी केले आहे.

शर्मिला कलगुटकर | Maharashtra Times 31 Jan 2018, 1:00 am
मुंबई : सर्वसामान्यांमध्ये थायरॉइड होण्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे. बदलत्या जीवनशैलीसह जेवणात असणारे आयोडिनयुक्त मीठ त्यासाठी कारणीभूत असल्याचे महत्त्वाचे संशोधन डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी केले आहे. शरीराला गरज असलेले आयोडिन समुद्री मिठातून म्हणजेच खडेमिठातूनही योग्य प्रमाणात मिळते. मात्र आयोडिनयुक्त मिठाच्या अतिवापरामुळे थायरॉइड होण्याचे प्रमाण वाढत आहे, असा निष्कर्ष डॉ. बावस्कर यांनी अभ्यासांती काढला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13


विंचूदंशावर प्रभावी औषध शोधणारे ज्येष्ठ डॉक्टर बावस्कर यांनी तीन वर्षांपासून महाड येथे दहा हजारांहून अधिक रुग्णांचा अभ्यास केला. त्यांच्याकडे उपचाराला येणाऱ्या स्त्री व पुरुषांमध्ये थायरॉइडचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत होते. वजन वाढणे, चक्कर येणे, सतत ग्लानी येणे अशा लक्षणांसाठी थायरॉइडच्या तपासण्या करू का, अशीही विचारणा रुग्णांकडून होत होती. आहारातील तेलाच्या वापरासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रात सजगता असते. मात्र थायरॉइडवर मिठाच्या वापराचा प्रभाव कसा असेल, त्यामुळे या ग्रंथी अधिक सक्रिय होत असतील का, याविषयी डॉ. बावस्कर यांनी अभ्यास सुरू केला.

तीन वर्षांत दहा हजार रुग्णांपैकी आठशे रुग्णांना थायरॉइड असल्याचे निदान झाले. स्त्री-पुरुषांमध्येही थायरॉइड वाढत असल्याचे दिसून आले. या अभ्यासासह त्यांनी महाडपासून ५० किमीवरील दुर्गम गावांतील स्थानिकांच्या रक्ताचेही नमुने घेतले. आयोडिनयुक्त मिठाचा वापर न होणाऱ्या या गावांतील एकाही व्यक्तीला थायरॉइड असल्याचे निदान झाले नाही. त्यामुळे थायरॉइड असलेल्या व नसलेल्या दोन्ही प्रकारच्या रुग्णांच्या तौलनिक अभ्यासामध्ये काही महत्त्वाचे निष्कर्ष डॉक्टरांनी काढले. लवकरच हा अभ्यास आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पत्रिकेमध्ये प्रसिद्ध केला जाणार आहे.

रासायनिक प्रक्रियेतून आयोडिन मिठाची निर्मिती

आपल्या अभ्यासाविषयी 'मटा'ला माहिती देताना डॉ. बावस्कर म्हणाले, 'आयोडिनयुक्त महागडे मीठ उघड्यावर ठेवल्यास त्याला पाणी सुटत नाही. समुद्री मीठ बाहेर ठेवल्यास काही मिनिटांतच ओलसर होते. मात्र दाणेदार, शुभ्र मिठाची आपल्याला भुरळ पडली आहे, हे आयोडिनयुक्त मीठ काही विशिष्ट रासायनिक पदार्थांचा वापर करून बनवतात. त्यामुळे ते शरीरास घातक असते.

खडेमिठातूनही आयोडिन मिळते

हिमाचल प्रदेशसारख्या भागात पाण्यामध्ये आयोडिन नसल्यामुळे गॉयटर झाल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या होत्या, तेव्हा आहारात आयोडिनयुक्त मिठाचा वापर सुरू झाला. देशात प्रत्येक ठिकाणची भौगोलिक स्थिती वेगवेगळी असते, त्यामुळे तो एकच निकष सगळीकडे लागू पडत नाही. खड्या मिठातूनही शरीराला आवश्यक असलेल्या आयोडिनची गरज भागते. जेवणात चार ग्रॅम इतके मीठ पुरेसे असते. मात्र आपल्याकडे फळांनाही मीठ लावले जाते. पापड, लोणची, साठवलेले हवाबंद पदार्थ, सॉस यांतून अतिरिक्त मीठ शरीरात जाते, त्यातून आजार बळावतात. आयोडिनच्या कमतरतेमुळे आजारांची लागण होत असली तरीही थायरॉइड ग्रंथीमधून बाहेर पडणारे थायरॉक्सिन अधिक प्रमाणात स्त्रवले तरीही त्यामुळे शरीराला अपाय होऊ शकतो, हे वेळीच लक्षात घ्यायला हवे, याकडे डॉ. बावस्कर लक्ष वेधतात.
लेखकाबद्दल
शर्मिला कलगुटकर
शर्मिला कलगुटकर या महाराष्ट्र टाइम्स च्या मुंबई आवृत्तीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांना पत्रकारितेमध्ये २१ वर्षाचा अनुभव आहे. त्या आरोग्य, सामाजिक, जेंडर अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्यापूर्ण लिखाण आणि वार्तांकन करतात. आरोग्यक्षेत्रातील अनेक गैरप्रकारांना त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. या कार्याची दखल घेत त्यांना पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज