अ‍ॅपशहर

आज उत्तरपत्रिका तपासणीचा निकाल

गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या वर्तुळात अडकलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन असेसमेंटसाठी आज, शनिवारचा दिवस निर्णायक ठरणार आहे. यंदापासून सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकांचे ऑनलाइन असेसमेंट करण्याचे विद्यापीठाने घोषित केले असून यासाठी कंपनीची निवड उद्या होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Times 22 Apr 2017, 3:06 am
ऑनलाइन असेसमेंटसाठी निविदा जाहीर होणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम today is the result of answer paper check
आज उत्तरपत्रिका तपासणीचा निकाल


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या वर्तुळात अडकलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन असेसमेंटसाठी आज, शनिवारचा दिवस निर्णायक ठरणार आहे. यंदापासून सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकांचे ऑनलाइन असेसमेंट करण्याचे विद्यापीठाने घोषित केले असून यासाठी कंपनीची निवड उद्या होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्यांदा राबविण्यात आलेल्या या प्रक्रियेत कोणत्या कंपन्या भाग घेणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कंपनी निवडीवर आगामी विद्यार्थ्यांच्या निकालाचे भवितव्य ठरणार आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे निकाल लवकर लागावे या दृष्टीकोनातून येत्या एप्रिलपासून होणाऱ्या परीक्षांच्या सर्व उत्तरपत्रिकांचे ऑनलाइन असेसमेंट करण्याची घोषणा केली होती. मात्र या प्रक्रियेसाठी निविदा प्रक्रियेला म्हणावे तितका प्रतिसाद न मिळाल्याने अद्याप ही प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे सध्या विद्यापीठात तब्बल ४ लाखांहून अधिक उत्तरपत्रिका तशाच पडून राहिल्या आहेत. इतकेच नव्हे तर विद्यापीठाच्या सर्व विषयांच्या निकालांवर ही टांगती तलवार आहे. यामुळे शनिवारी होणाऱ्या या निविदा प्रक्रियेकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यासाठी आज विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत या निविदा उघडून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

या अगोदरही ही प्रक्रिया राबविण्यात आली होती. तेव्हा फक्त दोनच कंपन्यांनी भाग घेतला होता. मात्र ते या प्रक्रियेसाठी योग्य न ठरल्याने दुसऱ्यांदा ही प्रक्रिया राबविण्यात आली असून यात जवळपास तीन कंपन्यांनी भाग घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रक्रियेत एका मोठ्या कंपनीने देखील भाग घेतला असल्याची माहिती हाती आली आहे. विद्यापीठ प्रशासन मात्र या निविदा प्रक्रियेबाबत चांगला प्रतिसाद मिळेल यावर ठाम आहे. या निविदा प्रक्रियेनंतर येत्या १० दिवसांत या कंपनीला सर्व सोपस्कार पार पाडून निकालाची तयारी पूर्ण करावी लागणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज