अ‍ॅपशहर

युनियन बँकेच्या खातेदारांचा डेटा लीक

बँकांमधील एकामागून एक घोटाळे समोर येत असतानाच आता युनियन बँकेच्या सांताक्रूझ येथील शाखेतील ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे ७० खातेदाराचा डेटा चोरीला गेला असून त्याआधारे भामट्यांनी जवळपास १५ ते २० लाख रुपये वेगवेगळ्या ठिकाणांहून काढल्याचे समोर आले आहे.

Dipesh More | महाराष्ट्र टाइम्स 13 Dec 2019, 6:11 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: बँकांमधील एकामागून एक घोटाळे समोर येत असतानाच आता युनियन बँकेच्या सांताक्रूझ येथील शाखेतील ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे ७० खातेदाराचा डेटा चोरीला गेला असून त्याआधारे भामट्यांनी जवळपास १५ ते २० लाख रुपये वेगवेगळ्या ठिकाणांहून काढल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भामट्यांनी काढलेल्या रकमेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cyber


युनियन बँकेची सांताक्रूझच्या जुहू तारा रोडवर शाखा आहे. ८ आणि ९ डिसेंबर रोजी खात्यामधून परस्पर पैसे काढण्यात आल्याच्या तक्रारी बँकेकडे येऊ लागल्या. खातेदारांच्या खात्यामधून सुमारे तीन ते १५ हजार आणि त्यापेक्षा अधिक रक्कम काढण्यात आली होती. हा हा म्हणता तक्रारदारांची संख्या वाढत गेली आणि या खातेदारांनी शाखेत गर्दी केली. एकाच वेळी इतक्या खातेदारांचे पैसे गेले आणि तेदेखील एका शाखेतील खातेदारांचे असल्याने सर्व्हरच्या माध्यमातून डेटा चोरण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा प्रकार उजेडात येताच युनियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार केली. माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच इतर कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरण गंभीर असल्याने तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. सायबर पोलिसांकडून तांत्रिक मदत घेतली जात आहे.

बनावट कार्डने हेराफेरी

चोरण्यात आलेल्या डेटावरून बनावट एटीएम कार्ड तयार करून वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसे काढण्यात आले आहेत. एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यात येत असून त्याआधारे शोध सुरु असलयाचे सांताक्रूझ पोलिसांनी सांगितले.

खातेदारांमध्ये घबराट

एकाच बँकेतील आणि एकाच शाखेतील सुमारे ७० खात्यांमधून पैसे काढण्यात आल्याने खातेदारांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. खातेदारांनी घाबरू नये, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. ज्यांच्या खात्यातून पैसे गेले, अशा ग्राहकांना बँकेने डिस्प्युट फॉर्म दिले आहेत.
लेखकाबद्दल
Dipesh More

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज