अ‍ॅपशहर

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून आमदारकी?

विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त सदस्यांच्या रिक्त जागेसाठी शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांच्या नावाची शिफारस केली जाणार असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Oct 2020, 5:55 pm
मुंबई: राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त केल्या जाणाऱ्या १२ जागांसाठी महाविकास आघाडीनं नावं निश्चित केल्याचं समजतं. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांना शिवसेनेकडून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केल्याचं सूत्रांकडून समजतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Urmila Matondkar


राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेत १२ जागा भरावयाच्या आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष त्यासाठी प्रत्येकी चार नावे सुचवणार आहेत. ही नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहेत. राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येणारे सदस्य विविध क्षेत्रांतील असावेत, असा संकेत आहे. तशी नावे नसल्यास राज्यपालांकडून ही नावे फेटाळली जाऊ शकतात. त्यामुळंच महाविकास आघाडीनं संभाव्य यादीत विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केल्याचं समजतं. त्यात शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार असल्याचं कळतं. उर्मिला या अभिनय क्षेत्रातील असल्यानं त्यांच्या नावाला राज्यपालांकडून आक्षेप घेतला जाण्याचीही शक्यता कमी आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी स्वत: उर्मिलाशी चर्चा केल्याचं समजतं. मात्र, उर्मिला मातोंडकर यांनी ही ऑफर स्वीकारली की नाही, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

वाचा: 'मानलं पवार साहेब आपल्याला... एका दिवसात वर्षभराची उतरून टाकता'

याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता, 'मी देखील अशी चर्चा ऐकतो आहे. तो अधिकार मंत्रिमंडळाचा आणि मुख्यमंत्र्यांचा असतो. उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे हे घेतील. असं ते म्हणाले.

उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ साली काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या झंझावाती प्रचाराची चर्चाही झाली होती. मात्र, त्यावेळी भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. कालांतरानं काँग्रेसमधील अंतर्गत वादातून त्या पक्षातून बाहेर पडल्या. मात्र, विविध मुद्द्यांवर त्या मतप्रदर्शन करत होत्या. अभिनेत्री कंगना राणावत हिनं बॉलिवूडवर केलेले आरोप, मुंबईबद्दल केलेलं वक्तव्य या सर्व विषयांवर त्यांनी जाहीर मत मांडत कंगनाचा समाचार घेतला होता.

मुंगेर गोळीबार: शिवसेनेने भाजपला पुरते कोंडीत पकडले!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज