अ‍ॅपशहर

देवेंद्र फडणवीसांसमोर सगळ्यात मोठं आव्हान कोणतं? शिवसेनेनं तिरकस शब्दांत चढवला हल्ला

Uddhav Thackeray : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातूनही भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार समाचार घेण्यात आला आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2022, 7:26 am
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यातून भाजपसह बंडखोर शिंदे गटावरही जोरदार निशाणा साधला. तसंच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरूनही भाजपला आव्हान दिलं. मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातूनही भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार समाचार घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम devendra fadanvis uddhav thackeray
देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरे


'महाराष्ट्रातील वातावरण उद्योग-व्यापारासाठी सध्या निकोप नाही. महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक 'खोके कंपनी'त झाली. त्या खोक्यांची आता वसुली सुरू झाल्याने उद्योग व गुंतवणूकदारांची पळापळ सुरू आहे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाहीच, पण महाराष्ट्राला दुश्मन ठरवले जात आहे. महाराष्ट्राची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान फडणवीस यांच्या समोर आहे. बाकी टक्केवारीचा नवा हिशेब घ्यायला शेलारांचे नियोजन मंडळ आहेच,' असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार; शिवसेना उच्च न्यायालयात; आज होणार फैसला?

'फडणवीसांवर राजशकट हाकण्याची जबाबदारी, कारण...'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती उत्सवादरम्यान मंडळांना दिलेल्या भेटीवरूनही शिवसेनेनं शेलक्या शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे. 'एकनाथ शिंदे हे नामधारी मुख्यमंत्री आहेत व त्यांचे चाळीस आमदारही मुख्यमंत्री म्हणूनच वावरत आहेत. त्या अराजकातून राज्य चालवण्याची जबाबदारी फडणवीस यांच्यावर पडते. मुख्यमंत्री म्हणून शिंद्यांवर शिवसेना फोडण्याची, गणपती दर्शन, उत्सव मंडळे, पूजा, लग्न समारंभांना भेटी देण्याची जबाबदारी आहे. फडणवीसांवर राजशकट हाकण्याची जबाबदारी आहे,' असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

आघाडीबाबत एकमत होईना; अंधेरी पोटनिवडणूकीत सेनेच्या प्रस्तावाचा काँग्रेसला विसर

दरम्यान, 'फॉक्सकॉन प्रकरणात फडणवीस काय म्हणतात याकडेच गांभीर्याने पाहिले जाते. फडणवीस यांची भूमिका संयमाची आहे, पण महाराष्ट्राची स्पर्धा गुजरातशी नाही. महाराष्ट्राचे गुजरातशी भांडण असण्याचे कारण नाही. तुम्ही गुजरातला लहान भाऊ मानता. शिवसेनेने गुजरातला नेहमीच जुळय़ा भावाचा मान दिला. मुंबई हे जेव्हा द्विभाषिक राज्य होते तेव्हा गुजरात व महाराष्ट्र एकच होता. आपापल्या भाषिक राज्यांसाठी मराठी माणसांबरोबरच गुजराती बांधवांनाही मोरारजी देसाईंच्या अतिरेकी गोळीबारात हौतात्म्य पत्करावे लागले. महाराष्ट्र व गुजरातचा जन्म एकाच गर्भातून झाला. दोन्ही राज्ये व बांधव नेहमीच गुण्यागोविंदाने नांदले. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातचे नातेसंबंध काय ते फडणवीस यांनी सांगण्याची गरज नाही,' असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख