अ‍ॅपशहर

ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची; मग शिवसेना कोणाची? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

Cm Eknath Shinde on shiv sena: खरी शिवसेना कोणाची याचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. अशात बीकेसी मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना कोणाची याचे उत्तर दिले

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2022, 10:19 pm
मुंबई: शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर पक्ष कोणाचा यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात लढाई सुरू झाली. खरी शिवसेना कोणाची यासाठी दोन्ही गटाने निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात कायदेशील लढाई सुरू केली. या संघर्षाच्या वेळी दोन्ही गटाचे वेगवेगळे दसरा मेळावे झाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Shiv Sena


शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. तर मुख्यमंत्री यांनी भाषणाच्या सुरुवातीला खरी शिवसेना कोणाची याचे उत्तर दिले. बाळासाहेब यांच्या विचारांचे वारसदार कोण आहे या प्रश्नाचे उत्तर या गर्दीने दिले आहे. तुम्ही न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मिळवले. पण मी मुख्यमंत्री असून देखील त्यात हस्तक्षेप केला नाही. बाळासाहेबांच्या विचारांना मुठमाती दिलात, आता त्या जागेवर उभा राहण्याचा आणि बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला आहे का असा सवाल शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

वाचा-शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरे हे काय बोलून गेले; 'माणसाची हाव किती असते..

बाळासाहेब रिमोटने सरकार चालवायचे आणि तुम्ही...

बाळासाहेबांनी ज्या पक्षांचा उल्लेख हरामखोर असा केला तुम्ही त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली. बाळासाहेब रिमोटने सरकार चालवायचे, तुम्ही तर शिवसेना पक्षाचा रिमोट काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे दिला. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी आणि हिंदुत्वासाठी भूमीका घेतली. आम्ही भूमीका जाहीरपणे घेतली लपून छपून घेतली नाही, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी मी ३ महिने राज्यभर फिरतोय लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.

वाचा- उद्धव ठाकरेंचा एकच शिवसैनिक संपूर्ण शिंदे गटाला पुरून उरला; असं काही बोलला की...

राज्यातील लोकांचा जो पाठिंबा मिळत आहे त्यावरून मी हे सांगतो की, ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ही शिवसेना ना एकनाथ शिंदेंची ही फक्त आणी फक्त बाळासाहेंबांच्या विचारांची शिवसेना आणि तुम्हा तमाम शिवसेनिकांची शिवसेना आहे. एकनाथ शिंदेंच्या या वाक्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख