म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
कुलाब्याच्या उच्चभ्रू परिसरात देहविक्रय व्यवसाय चालवणाऱ्या महिला दलालास गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच अटक केली. तसेच देहविक्रय करण्यासाठी आणलेल्या दोन तरुणींची पोलिसांनी सुटका केली.
वांद्रे येथील एका तरुणामार्फत कुलाब्यातील महिला दलाल देहव्यापारासाठी तरुणी पुरवत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१च्या अधिकाऱ्यांना मिळाली. या अधिकाऱ्यांनी बोगस ग्राहक बनून या महिलेशी संपर्क साधला. ठरल्यानुसार कुलाबा येथील एक हॉटेलमध्ये महिला दलाल दोन तरुणींना घेऊन आली. त्यांना पाठवण्याच्या मोबदल्यात बोगस ग्राहकाकडून पैसे स्वीकारत असताना साध्या वेषात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तिच्यासह तरुणींना ताब्यात घेतले. या प्रकरणात कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी या महिला दलालास कुलाबा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.